वीजपुरवठा खंडित झाल्याने आरटीओ कार्यालयाबाहेर रांगच रांग

0

जनरेटर खराब; अधिकारी उशिरापर्यंत करणार काम

सांगवी : प्रत्येक गुरुवारी महावितरणकडून शहर आणि परिसरातील विद्युत वाहिन्यांचे काम केले जाते. त्यामुळे गुरुवारी शहरात वीजपुरवठा वारंवार खंडित केला जातो. याच कारणामुळे चिखली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वीजपुरवठा गुरुवारी खंडित झाला. त्यामुळे नागरिक आरटीओ कार्यालयाबाहेर तासन्तास उभे होते. आरटीओ कार्यालयातील जनरेटर ऐन कामाच्या वेळी खराब झाल्याने त्याचाही त्रास नागरिकांना झाला आहे.

गुरूवारी सुट्टीमुळे नागरिकांची गर्दी
भोसरी, चाकण आणि शहराच्या विविध भागातील कंपन्यांना गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असते. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आरटीओ मधील कामे उरकण्यासाठी नागरिक आरटीओकडे धाव घेतात. लवकर काम झाले तर लवकर घरी जाऊन आराम करण्याच्या मनस्थितीत असलेले नागरिक आज दिवसभर कार्यालयाबाहेर रांगेत ताटकळत उभे राहिलेले दिसले. सुमारे 350 नागरिकांची कामे आरटीओ कार्यालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याने रखडली. आरटीओ कार्यालयात जनरेटर बसविण्यात आला आहे. मात्र ऐन कामाच्या दिवशी जनरेटर बंद पडला. त्यामुळे देखील नागरिकांची चांगलीच फरफट झाली.

पैसे भरण्यासाठी अडचण नाही
याबाबत बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील म्हणाले की, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बहुतांश काम संगणकीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम कामावर होतो. कार्यालयातील वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जनरेटर बसविण्यात आला आहे. मात्र जनरेटर खराब झाले असल्याने अडचण निर्माण झाली आहे. आरटीओचे सर्व कामांचे शुल्क ऑनलाईन भरण्यात येतात. त्यामुळे पैसे भारण्यासाठी नागरिकांना अडचण येणार नाही. त्याव्यतिरिक्त अन्य काही कामांसाठी नागरिकांना आज थोडा उशीर झाला आहे. मात्र, आरटीओचे अधिकारी उशिरापर्यंत काम करून सर्व नागरिकांची कामे करून देणार आहेत.