वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा बडगा

0

पुणे । पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी सुरू राहणार आहेत. वीजबिलांच्या थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणार्‍या घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मशून्य थकबाकी मोहीम नोव्हेंबरपासून सुरू केली आहे.

ही मोहीम या महिन्यात आणखी तीव्र करण्याची सूचना प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिली आहे. थकीत वीजबिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित होणारच, हा संदेश वीजपुरवठा खंडित करण्याच्या धडक कारवाईतून देण्याचे निर्देश त्यांनी पाचही जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले आहेत.

प्रभावी अंमलबजावणी करावी
पश्‍चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांची वसुली आणखी वेगाने होण्यासाठी शून्य थकबाकी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही, याची महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले. तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.