वीजेच्या खांब्याअभावी पसरले अंधाराचे साम्राज्य

साक्री । शहरातील प्रभाग क्रमांक एक आणि दोनमधील कॉलनी परिसराला जोडणार्‍या काशीदरा रोडवर वीज खांब अभावी असलेले अंधाराचे साम्राज्य दूर करीत जीर्ण वीजतारा बदलण्यासह वीजखांब बसवून नियमित ग्राहक असलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन नगरसेविका अ‍ॅड. पूनम शिंदे-काकुस्ते यांच्या नेतृत्वाखाली वीज अभियंता डी.एम.बाविस्कर यांना नुकतेच देण्यात आले. निवेदन देतेवेळी नगरसेविका अ‍ॅड. पूनम शिंदे-काकुस्ते, राजश्री जाधव, अशोक आखाडे, नवल गोसावी, हरी कानडे, सुरेश बुवा, हेमंत जाधव, चेतन देवरे, शंकर थोरात, देविदास पवार, पांडू पवार, प्रकाश तोरवणे, दिनेश बुवा, बी.एन.सूर्यवंशी, प्रदीप कानडे, सागर राठोड, हेमंत बोरसे, लक्ष्मण पुरी आदी उपस्थित होते.

 

प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील कॉलनी परिसराला जोडणार्या काशीदरा रोडवर वीज खांब अभावी असलेले अंधाराचे साम्राज्य दूर करीत जीर्ण वीजतारा बदलण्यासह वीजखांब बसवून नियमित ग्राहक असलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा. विद्युत सोयीसुविधा उपलब्ध करून घेण्यात अडचणी येत आहेत त्या दूर कराव्यात. प्रभाग क्रमांक एकमधील काशीदरा रोड परिसरात गजानन नगर, सुंदर नगर, रुपाई नगर, सखाराम नगर, छत्रपती संभाजी नगर, नयना सोसायटी, स्वामी हौसिंग सोसायटी, सावरकर नगर आदी वसाहती असून त्यात दिवसेंदिवस रहिवास क्षेत्र वाढत आहे. वीज ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. एवढेच नव्हे तर काशिदरा रोडचा शहरातील असंख्य नागरिक शेतीसाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र रस्त्यावर विजेचे खांब नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. ज्या ठिकाणी वीज खांब आहेत तेही जीर्ण अवस्थेत असून कधीही पडून येत एखादी दुर्घटना घडू शकते. मात्र, रहिवाशांच्या मागणीकडे वीज वितरण कंपनीचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

 

 

वीजतारा उपलब्ध करा

परिसरातील या रस्त्यावर सतत अंधाराचे साम्राज्य राहत असल्यामुळे अनेक वेळा सोनसाखळी चोरीचे प्रकार घडले आहेत. तसेच रस्ता हा नवीन महामार्गाच्या वळण रस्त्याला जोडणारा असल्यामुळे रात्री-अपरात्री भरधाव वेगाने वाहने या रस्त्यावरून वापरतात, रात्रीच्या वेळी शहरातून कॉलनीकडे एकट्या येणार्‍या महिलांना जीव मुठीत घेऊन यावे लागते. अशा परिस्थितीत तात्काळ विजेचे खांब तसेच वीजतारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वास्तविक या परिसरात अनेक वर्षापासून रहात असलेले नागरिक हे वीज वितरण कंपनीचे नियमित ग्राहक आहेत वीज वितरण कंपनी हे नियमितपणे ग्राहकांकडून वीज बिल वसुली करीत असते. अशावेळी आपण नैतिक जबाबदारी समजून घेत वीज वितरण कंपनीने वीज पोल उभे करून परिसरातील रहिवाशांची समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.