वीजेच्या धक्क्याने रखवालदाराचा मृत्यू

0

शिरपूर । तालुक्यातील वनावल येथील एका शेतात तुटून पडलेल्या वीज तारांचा स्पर्श झाल्याने एका रखवालदाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 28 रोजी सकाळी 7.30 वा.घडली. तालुक्यातील वनावल गावातील अमृत रेवाजी पवार यांच्या शेतात सुरेश गिलदार पावरा हा रखवालदाचे काम करीत होता. गेल्या एक महिन्यापूर्वी पवार यांच्या शेतातून गेलेली एलटी लाईनचा पोल पडून विद्युत तारा जमिनीवर पडलेल्या होत्या.

वीज वितरण कंपनी जबाबदार; दोषींवर कारवाईची मागणी
या संदर्भात शेतमालक पवार यांनी संबंधित विभागाचा लाईनमन यास अनेकदा तोंडी तक्रार केली असतांना देखील वीजतारा जोडले गेले नाही. दरम्यान आज सकाळी रखवालदार सुरेश पावरा हा शेतात काम करत होता. बैलांना पकडण्यासाठी सुरेश पावरा गेले असतांना जमिनीवर पडलेल्या तारांवर पाय पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूस महाराष्ट्र वीज वितरण कंपनी जबाबदार असल्यामुळे नाहक एकाचा बळी गेला. या संदर्भात ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीला निवेदन दिले आहे. तुटलेल्या तारा व पोल तातडीने दुरुस्त करावेत तसेच मयत सुरेश पावरा याच्या नातेवाईकांना कंपनीकडून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतमालक अमृत पवार, भरत पाटील, मनोहर पाटील, अशोक पाटील, प्रविण पाटील आदींनी केली आहे. मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. घटनेचे वृत्त मराविचे अधिकार्‍यांना कळवून त्यांनी रुग्णालयात भेट दिली नाही. त्यामुळे मयताच्या संतप्त नातेवाईकांनी जोपर्यंत मराविचे अधिकारी येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. अभियंता राजेश नेमाडे, कनिष्ठ अभियंता तिरुपती यांनी भेट दिली.