वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कार सरकारी ताफ्यात दाखल

0

मुंबई : राज्य सरकारकडून यापुढे वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारच खरेदी करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज ५ इलेक्ट्रीक कार सरकारी ताफ्यात दाखल करण्यात आल्या असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हा कार्यक्रम पार पडला.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः या इलेक्ट्रीक कारमधून फेरी मारली. डीसी किंवा एसी करंटवर या गाड्या चार्ज करता येणार आहेत. मंत्रालयात तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन ठेवण्यात आलं आहे. एकदा या कारची बॅटरी चार्ज केल्यानंतर १२० किमी अंतर पार करू शकणार आहे.

या गाड्यांची कामगिरी पुढील सहा महिने पाहिली जाईल. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी १४ गाड्या घेणार आहे. शासकीय सेवेत येत्या वर्षभरात १००० गाड्या सामावून घेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे. वाढत्या पेट्रोलचे दर पाहता शासकीय सेवेत या इलेक्ट्रीक कार उत्तम ठरणार आहेत.