वीज कंपनीच्या शॉकनंतर ‘महसूल’साठी तहसीलनेही फिरवला ‘दांडपट्टा‘

0
लक्तरे वेशीवर ; बोदवड तालुक्यात शासन विभागातील दोन विभागांमध्ये कुरघोडी
भुसावळ:– वीज बिलाच्या थकबाकीपोटी शासकीय धान्य गोदामाचा वीजपुरवठा वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी कट केल्यानंतर महसूल विभागाने या कारवाईची परतफेड करीत अकृषिक कर थककवल्याने बोदवडमधील 132 केव्हीमधील सहा.अभियंत्यांसह मलकापूर रोडवरील ज्यु.इंजिनिअरच्या दालनालाच सील ठोकत दांडपट्टा फिरवल्याने तालुक्यात खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरातही अशाच पद्धत्तीने कारवाई झाल्याने या कारवाईची आठवण आता बोदवडवासीयांनाही झाली आहे. शासनाच्या अखत्यारीत येणार्‍या दोन विभागातील अधिकार्‍यांनी लावलेल्या या पोरखेळमुळे हे विभाग टिकेचे धनी ठरत आहेत.
 वीज पुरवठा कट करताच कार्यालये केली सील
वीज वितरण कंपनीची तहसील कार्यालयाकडे 86 हजार 380 रुपये तसेच जामनेर रोडवरील शासकीय गोदामाची 28 हजार 800 रुपये थकबाकी आहे. अनुदान उपलब्ध नसल्याने ते उपलब्ध होताच थकबाकी भरू, असे पत्र 1 मार्च तहसीलदारांनी उपअभियंत्यांना दिल्यानंतरही गुरुवारी गोदामाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार बी.डी.वाडीले, मंडळाधिकारी आर.व्ही.सुरवाडे, तलाठी जी.आर.मराठे, अव्वल कारकून वाघ, अव्वल कारकून अडकमोल आदींच्या पथकाने अकृषिक कर थकवल्याने भुसावळ रोडवरील सहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयासह मलकापूर रोडवरील उपअभियंत्यांच्या कार्यालयाला सील ठोकले.
अकृषिक करापोटी दोन लाखांवर थकबाकी
महसूल प्रशासनाची वीज कंपनीकडे सुमारे दोन लाखांवर अकृषिक करापोटी थकबाकी आहे. त्यात बोदवड 132 केव्हीकडे 24 हजार 650,  बोदवड कार्यालयाकडे 20 हजार 250, मुक्तळ 133 केव्हीकडे 71 हजार 310, एणगावकडे सात हजार 100,  जामडीकडे 10 हजार, गोळेगावकडे 10 हजार 800 रुपयांची थकबाकी असल्याचे तहसीलदार थोरात म्हणाले.