जळगाव । महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वाघूर प्रकल्पाचे वीज बिल 3 कोटी 68 लाख रुपये थकीत होते. या थकबाकीपोटी महावितरणने वीज कनेक्शन खंडीत करण्याची नोटीस महानगर पालिकेला बजावली होती. थकबाकी भरली नसती तर शहरातील पाणीपुरवठा देखील खंडीत झाला असता. मात्र, महावितरणाची महानगरपालिकेने पहिल्या हफ्त्यातील बिल भरल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहिला आहे.
मनपाचे वाचणार 50 लाख
नोटीस मिळाल्यानंतर आयुक्त जीवन सोनवणे यांनी महावितरणच्या अधिकार्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार पाच हफ्त्यांत जर मनपाने पैसे भरले तर महावितरणच्या प्रोत्साहन योजनेनुसार 20 टक्के सवलत मिळेल, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. त्यामुळे मनपाच्या आयुक्तांनी 73 लाख 61 हजार 751 रुपये तसेच चालू वीज बील 44 लाख 54 हजार भरणा केला आहे. या योजनेत सहभाग घेतल्याने महानगर पालिकेचे 49 लाख 32 हजार रूपये माफ होणार आहेत.
आयुक्तांची नाराजी
महावितरणने प्रोत्साहन योजनेविषयी आधीच माहिती दिली असती, तर पाणीपुरवठ्याची बिले पाच हफ्त्यांत दिले असते. थकबाकीचा आकडा फुगला नसता, अशा शब्दांत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेतर्फे चालू बिल नियमित अदा करण्यात येत असल्याने महावितरणने प्रोत्साहन योजनेची माहिती द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.