वीज निर्मितीत दीपनगरचे केंद्र ठरले राज्यात अव्वल

0

उत्तम भारांकासाठी देशात सातवे स्थान ; मुख्यालयाकडून व्यवस्थापनाचा गौरव

भुसावळ- दीपनगर प्रकल्प राज्यातील सर्व वीज निर्मितीच्या केंद्राच्या एप्रिल 2018 महिन्यात अव्वल ठरला असून उत्तम भारांकासाठी भुसावळ वीज केंद्राने देशात 17 वे स्थान पटकाविले असल्याचे माहिती जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार यांनी ‘दैनिक जनशक्ती‘शी बोलताना दिली. या कामगिरीबद्दल महानिर्मिती मुख्यालय व्यवस्थापनाने दीपनगरातील अभियंत्यांसह कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांच्या कुशल नेतृत्वाखाली 1210 मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची माहे एप्रिल 2018 मधील कामगिरी महानिर्मितीच्या सर्व विद्युत केंद्रांमधून प्रथम क्रमांकाची ठरली आहे.

उत्तम भारांक श्रेणीत 17 वे स्थान
महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत भुसावळ वीज केंद्राची कामगिरी माहे एप्रिल 2018 मध्ये 91.69 टक्के भारांक इतकी आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय पातळीवरील उत्तम भारांक श्रेणीत महानिर्मितीच्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने सतराव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांचे विशेष अभिनंदन महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संचालक (संचलन) बिपीन श्रीमाळी, कार्यकारी संचालक (सं व सु ) 1 व 2- चंद्रकांत थोटवे, कैलाश चिरूटकर व राजू बुरडे यांनी केले आहे.

परीश्रमाचे चीज -आर.आर.बावस्कर
वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत परीणामकारक ठरणार्‍या विविध घटकांवर सुनियोजित पद्धतीने परीश्रम घेतल्याने महत्तम कार्यक्षमता गाठण्यात भुसावळ वीज केंद्राला हे यश प्राप्त झाले असल्याचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर म्हणाले. मुख्यालयातील वरीष्ठ व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व महानिर्मिती टीम भुसावळच्या सांघिक परीश्रमाची ही पावती असल्याचेही त्यांनी नम्रपणे नमूद केले.