फैजपूर । सूचना देवूनही कामांना दिरंगाई, आढावा बैठकीला अनुपस्थित राहणार्या अधिकार्यांना तत्काळ नोटीस द्या, अशी सूचना आमदार हरिभाऊ जावळे यांनी बुधवारी प्रांताधिकार्यांना दिली. मतदारसंघातील पावसाळापूर्वी आढावा बैठकीत जावळेंनी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यासह सेवा हमी कायद्यावर जोर दिला.
खरीपासाठी केलेल्या पूर्वतयारीची माहिती
फैजपूर पालिका सभागृहात सकाळी झालेल्या बैठकीला शासनाच्या 27 विविध विभागांतील अधिकार्यांना बोलावण्यात आले होते. सर्वप्रथम कृषी विभागाने खरीपासाठी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यानंतर आमदार जावळेंनी जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलसंपदा विभागाकडील योजना राबवणार्या विभागांनी कामांच्या गुणवत्तेवर भर देण्यात आला. महिला बालविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, यावल येथील धान्य गोदामाचे काम चालू हंगामापूर्वी मार्गी लावण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली. दोन्ही तालुक्यातील तहसील, पोलिस अधिकार्यांची बैठकीस उपस्थिती होती.
वीज वितरणला केली सुचना
शेती शिवारातील वाकलेले वीज खांब सरळ करणे, आवश्यक तेथे नवीन खांब टाकण्याची सूचना आमदार जावळेंनी वीज वितरणला केली. तसेच बैठकीला उशिराने आलेले यावलचे अभियंता आर.आर.चिरमाडे यांना रस्त्यांच्या साइटपट्ट्यांची कामे मार्गी लावण्यास सांगण्यात आले.