वीज महावितरणचा गलथान कारभार: परसामळ येथील शेतकर्‍यांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे

0

शिंदखेडा:तालुक्यातील परसामळ येथे मागील पाच दिवसांपासून काही डीपींचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. येथील वायरमन रस्त्यालगतच्या डिपीचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नदीच्या पलीकडे काही डीपी आहेत. तिथे काहीही समस्या निर्माण झाली तर दोन-तीन दिवस जात नाहीत. त्यामुळे सतत वीज पुरवठा खंडित होतो. पाण्याअभावी शेतातील पीक करपायला लागलेली आहेत. 24 तासमधून आठ तास वीज पुरवठा केला जातो. तो पण सुरळीत होत नाही. आठ तासांमधून दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडित होतो. यावर्षी विहिरींना भरपूर पाणी असूनही महावितरणाच्या गलथान कारभारामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
महावितरण कार्यालय शिंदखेडा येथील उपअभियंता जयंत बोरसे व सहाय्यक अभियंता पाटील व परसामळ येथील वायरमन दीपक गायकवाड यांना वारंवार फोन करूनही ते फोन उचलत नाहीत. फोन उचलला तरी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही वीज पुरवठा पूर्ववत होत नाही. त्यामुळे परसामळ येथील शेतकरी जितेंद्र गिरासे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे मेलद्वारा तक्रार करुन साकडे घातले आहे. यापूर्वी तालुक्यातील काही गावातील शेतकर्‍यांनी विजेसंदर्भात तक्रार केल्यावर त्यांनाही संबंधित अधिकार्‍यांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसात जाण्याची धमकी दिली होती. आता ऊर्जामंत्री संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे.