वीज वितरण कंपनीविरोधात काँग्रेस छेडणार आंदोलन

0

 शहापूर : शहापूर तालुक्यात वीज कंपनीच्या हलगर्जीमुळे वारेमाप बिल येत असून या महिन्यात चुकीचे रिडींग आणि विजेचा लंपडाव या विरोधात शहापूर तालुका काँग्रेस पार्टीने रणशिंग फुंकले आहे. येत्या 10 दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

शहापूर तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कटकवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अभियंत्यांसमोर वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा पाढा वाचला. रिडींग घेणारे कर्मचारी हे कोणत्याही वेळी रिडींग घेऊन जातात. तर कधी रिडींग न घेता बिल आकारणी करतात. मीटर सुरु असताना फोल्टी मीटर दाखवून वारेमाप रिडींग देण्यात येते. तसेच मोठ्या प्रमाणात होत असलेला विजेचा लपंडाव, कर्मचार्‍यांचे उद्धट वागणे आणि या महिन्यात वीज बिलात झालेला गोंधळ यावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. तसेच सुधारणा न झाल्यास 10 दिवसात उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. समस्या लवकरच सोडवू सहाय्यक अभियंता कटकवार यांनी काँग्रेस शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष महेश धानके यांनी दिली. शिष्टमंडळात काँग्रेस सेवादल अध्यक्ष रामचंद्र जोशी, जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख, रवींद्र परटोले, राजेश विशे, भास्कर जाधव, अंकुश भोईर, महेंद्र आरज, बापू विचारे, यांचा समावेश होता.