वीज वितरण तांत्रिक कामगारांनी काढला मोर्चा

0

भुसावळ । महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे तांत्रिक कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महात्मा गांधी पुतळा ते तापी नगरातील विज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतर कार्यकारी अभियंत्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

तापी नगरातील कार्यालयासमोर निदर्शने
या मागण्यांमध्ये सर्व तांत्रिक कर्मचार्‍यांची पदे त्वरीत भरावी, तांत्रिक कर्मचार्‍यांना आवश्यक टीपी व सुरक्षा साधने हजेरी पटावरील संख्येनुसार देण्यात यावीत, 1 हजार पेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील वसूलीसाठी लाईन स्टापला जबाबदार धरण्यात येऊ नये. वीज कनेक्शन कापण्यास लाईन स्टाप सहकार्य करेल परंतु वसुलीसाठी संबंधित अभियंत्यांनी सोबत जावे, वसुलीसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे, शेती पंपाचे मिटर रिडींग व बील वाटपाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अनुकंपा तत्वावरील सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावी, तांत्रिक कर्मचार्‍यांना आठ तासांपेक्षा जास्तीचे काम देवू नये व दिल्यास जादा कामाचा मोबदला मिळावा, एका कर्मचार्‍याकडे किती ग्राहक व किती डीसीटी असावे याची निश्‍चिती असावी, कक्ष प्रमुखाला मिळणार्‍या वाहन भत्त्याइतकाच वाहन भत्ता तांत्रिक कर्मचार्‍यास मिळावा, मृत तांत्रिक कर्मचार्‍याच्या पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे कायम सेवेत समावेशन करण्यात यावे, स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत ज्या तांत्रिक कमर्चार्‍यांची सेवा किमान दोन वर्षापेक्षा कमी असेल अशा कर्मचार्‍यांना सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. कार्यालयात जे.डी. पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी व्ही.वाय. पाटील, के.बी. सोनवणे, तुषार झोपे, सुनिल पाचपांडे, भुषण पाटील, जे.व्ही. चौधरी, मनोज चौधरी, रंजना पाथरवट, निलेश बारी आदी कर्मचारी उपस्थित होते.