महापालिकेकडून मेघडंबरी उद्घाटन कार्यक्रम
निगडी – देशाच्या सोनेरी इतिहासामध्ये महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. त्यांचा स्वाभिमान, निष्ठा, देशप्रेम, आणि त्यांनी केलेला कठोर त्याग प्रत्येक भारतीयांना कायम प्रेरणादायी ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक 13मधील महाराणा प्रतापसिंह उद्यानातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यावरील मेघडंबरीचे उद्घाटन रावल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता दत्ता साने, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, मनसे गटनेता सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक उत्तम केंदळे, नामदेव ढाके, माजी महापौर कविचंद भाट, अश्विनी बोबडे, अश्विनी जाधव, शर्मिला बाबर, प्रियांका बारसे, स्वीकृत सदस्य सागर हिंगणे, माजी प्रादेशिक अधिकारी प्रकाश लवडकर आदी उपस्थित होते.
विचार आत्मसात केले पाहिजे
जयकुमार रावल म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महावीरांचा जन्म एकाच युगात झाला असता तर भारताने संपूर्ण जगावर राज्य केले असते. लोकांनी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले पाहिजे. त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. त्यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहरामध्ये अनेक समाजाचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने राहातात. आपआपली संस्कृती जपताना सर्वांना सामावून घेतात. महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यासंबधी माजी महापौर कै.मधुकरराव पवळे, माजी महापौर कविचंद भाट यांनी मोलाचे काम केले आहे.
महाराणा प्रतापसिंह यांच्या अर्धाकृती पुतळयावर मेघडंबरीचे काम त्वरित करण्याचे नियोजन करुन त्यांच्या जयंती निमित्त सुशोभीकरणाची कामे महापालिकेने वेळेत केली असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.