खेड (अमितकुमार टाकळकर ) : ग्रामस्थ एकदा जागे झाले की ते ध्येयाने पेटून उठतात आणि शासनाच्या कामाची वाट न पाहता गावाच्या विकासासाठी एकत्र येतात. राळेगणसिध्दी (अण्णा हजारे), हिवरे बाजार (पोपटराव पवार) व रानमळा (पी. टी. शिंदे गुरुजी) ही त्याची काही नमुनेदार उदाहरणे आहेत. वन अधिकार्यांना गावातील योग्य कारभारी ओळखता आला पाहिजे आणि त्यांना पुढे करुन आपला कार्यभाग साधता आला पाहीजे.
रानमळा (ता. खेड) हे गाव वृक्षसंवर्धनाने कौटुंबिक नाती जोडून हरित महाराष्ट्राचे मॉडेल बनले आहे. काही वर्षापूर्वी रानमळ्यात ग्रामस्थांनी रावविलेल्या जन्म, विवाह, मृत्यू आदी प्रसंगाच्या निमित्ताने लोकसहभागातून वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर शहरी व ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रांमध्ये वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याबाबत शासनाने शासन निर्णय काढला असून त्यात रानमळा गावाचा आवर्जून उल्लेख केला आहे. पुरस्कारांचा मळा, रानमळा अशी आगोदरच राज्यात ख्याती असलेले हे गाव पुन्हा वृक्षलागवडीच्या महत्वपूर्ण योजनेत पुढे आले आहे.
या बाबत माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती चे अध्यक्ष पी. टी. शिंदे गुरुजी म्हणाले,वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना या योजनेंतर्गत रानमळा गावाचा नव्याने काढलेला शासन निर्णयात उल्लेख करून एक मॉडेल समोर ठेवले याचा आम्हा ग्रामस्थांना खूप अभिमान आहे. गेली 15 वर्षे आम्ही हा उपक्रम अविरत सुरु ठेवला आहे. यामुळे रानमळा गावाला अनेक शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. ’पुरस्कारांचा मळा, रानमळा’ अशी राज्यभर ओळख आहे. वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना हे तत्व घेत रानमळा ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम 15 वर्षापूर्वी हाती घेतला. यात सातत्य ठेवले. या कामात ग्रामपंचायत, ग्रामविकास प्रतिष्ठान, जिल्हा परिषद शाळा, महिला बचत गट, तरुण मंडळे, भजनी मंडळ, जेष्ठ नागरिक, गावाच्या जवळ असलेल्या ठाकरवाडीतील नागरिक यांचे मोठे सहकार्य लाभले.
अशी आहे संकल्पना :
आनंद वृक्ष – विद्यार्थी दहावी, बारावी, काही इतर परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यांना नोकर्या मिळतात. शहरातील निवडणुका होतात त्यात विजय होतो अशा अनेक आनंदाच्याक्षणी त्यांना वृक्षांची रोपे देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांना दिलेल्या झाडाची जोपासना करण्याची विनंती करावी.
शुभमंगल वृक्ष – माहेरची झाडी
विवाहप्रसंगी वधू-वराला आशीर्वाद म्हणून झाड/ फळझाडाचे रोप भेट द्यावीत. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या क्षेत्रातील मुली सासरी जाणार असल्याने त्याठिकाणी रोप मिळणार नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना रोपे द्यावीत. तर मुलगी सासरी गेली म्हणून तिच्या आईवडिलांना रोप देऊन मुलीला जशी माया लावली तशी या योपला माया लावून त्या झाडाचे संगोपन करण्यासाठी विनंती करावी.
स्मृती वृक्ष –
व्यक्तींचे निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना झाडे, फळझाडांची रोपे देवून संबधित व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करून त्यांना झाडाच्या रूपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जतन करण्यास विनंती करावी.
जन्मवृक्ष –
जन्माला येणार्या बालकांच्या जन्माचे स्वागत संबधित कुटुंबाला रोप देऊन करून मालाप्रमाणे त्यास जीव लावून त्याचे संवर्धन करण्याची विनंती बाळाच्या कुटुंबाला करण्यात यावी.
लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक, समाजातील प्रतिष्टीत व्यक्ती, पर्यावरण प्रेमी, दानशूर लोक,परिसरातील कंपन्याचा सामाजिक दायित्व निधी यांच्या माध्यमातून झाडे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग फोरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रोपवाटिका यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात झाडे उपलब्ध करून देण्याचे या शासन निर्णयात नमूद केले आहे. ही झाडे 30 जूनपर्यंत उपलब्ध करून 1 जुलै रोजी त्यांची लागवड झाली पाहिजे, असे नियोजन केले आहे. रोपांचा वाटप कालावधी, वृक्ष दिंडी, रोपांचे वाटप, वृक्ष लागवडीची नोंद, वृक्ष संवर्धनाचा आराखडा, नोडल अधिकार्याची निवड, महाराष्ट्र हरित सेना सदस्य नोंदणी, अहवाल, पर्यावरण प्रतिज्ञा आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. शासनाला अपेक्षित असणारे काम रानमळावासीयांनी करून सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे.