वृक्षारोपणाबाबत मुख्याध्यापकांचे नियोजन

0

मुक्ताईनगर । उचंदा येथील घाटे विद्यालयात तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी जे.डी. पाटील होते. सहविचार सभेत शासनाच्या वृक्षारोपणाबाबत तालुक्यातील शाळांचे नियोजन करण्यात आले. माध्यमिक मुख्याध्यापकांनी भाग घेतला होता.

यावर झाली चर्चा
सहविचार सभेत आधारकार्ड संदर्भातील विचारविनिमय करण्यात आला. तसेच इयत्ता नववीतील एससी, एसटी मुलींची माहिती तसेच इयत्ता दहावी पास होवून गेलेल्या एससी, एसटी मुलींची माहिती देण्याबाबत सुचना देण्यात आल्या. यात शासन निर्णयानुसार वृक्ष लागवडीसंदर्भात माहिती देण्यात आली. शालेय पोषण आहार संदर्भाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच मुख्याध्यापकांना दैनंदिन कामकाजात भेडसावणार्‍या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

मर्यादेपेक्षा जास्त प्रवेश घेतांना परवानगी घ्यावी
शासन निर्णयानुसार दप्तरांचा बोजा कमी करण्याबाबत मुख्याध्यापकांना सुचना देण्यात आल्या. नवोदय परिक्षेस अधिकाधिक विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी सुचना करण्यात आल्या. प्रवेश देतेवेळी वर्ग तुकड्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त प्रवेश घेतांना शिक्षण खात्यांची परवानगी घ्यावी. सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्यांच्या माहित्या ऑनलाईन पध्दतीने त्वरीत भराव्यात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्व सुचनांचे उपशिक्षकांनी काटेकोर पालन करावे. मानव विकास अंतर्गत अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलींना बस पासेस काढून लाभ द्यावा व इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना मानव विकास अंतर्गत येणार्‍या बस पासेसच्या सुविधा मिळवून द्याव्यात. याबाबत डेपो मॅनेजरशी समन्वय साधून बस व्यवस्थेविषयी चर्चा करण्यात येईल. रात्र अभ्यासिका, सायकल वाटप योजनेसाठी किमान पाच किलोमिटर अंतर असलेल्या गावांच्या मुलींना सायकल वाटप करण्यासाठी प्रस्ताव मागविण्याबाबत माहिती देण्यात आली. माध्यमिक शाळांतील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पाठ्यपुस्तक मिळत नसल्याने मुख्याध्यापकांच्या अडचणींमध्ये भर पडल्याने व जिल्ह्यावरुन पुस्तकांची पुर्तता होत नसल्याने मुख्याध्यापकांनी नाराजी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
सहविचार सभेस विस्तार अधिकारी सरोदे, केंद्रप्रमुख ठोसर, राजू तडवी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.पी. पाटील, डी.के. पाटील, आर.एस. पाटील, सुधाकर चौधरी, एन.एस. पवार, समन्वयक भोसले, संजय वाडीले, संदिप पाटील, महेंद्र तायडे उपस्थित होते.