मांडळ। शा सनाच्या एकच लक्ष चार कोटी वृक्ष या महत्वकांक्षी मोहिमेंतर्गत एच आर पटेल फार्मसी महाविद्यालयाचा मांडळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करवंद रोड वरील मांडळ शिवारात महावीर लॉन परिसरातील मोकळ्या जागेवर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र भाऊ पाटील, विद्याविहार हौसिंग सोसायटीचे चेअरमन अशोक कलाल, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक गुजर, मांडळचे सरपंच सुनील माळी, लौकीचे उपसरपंच डॉ. अरुण राजपूत व महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. संजय बारी, प्रा. प्रफुल्ल निनावे, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
प्रदूषणावर वृक्षारोपण प्रभावी
यावेळी देवेंद्र पाटील यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद करताना सांगितले कि वृक्षारोपण हे पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत गरजेचे आहे आणि वृक्ष लावल्या नंतर ते जगविण्यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बारी यांनी देखील मनोगत व्यक्त करताना सांगितले कि ग्लोबल वार्मिंग चा सामना करण्यासाठी वृक्षारोपण हे अत्यंत गरजेचे आहे तसेच त्यांनी वेगवेगळ्या प्रदूषणावर वृक्षारोपण कसे प्रभावी आहे हे देखील सांगितले.
100 वृक्षांची लागवड
यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ 100 वृक्षांचे रोपण केले व वृक्षांच्या संवर्धनासाठी सर्वोतोपरी पर्यंत करू अशी शपथ देखील घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. प्रशांतपाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच सुनील माळी, महाविद्यालाचे उपप्राचार्य डॉ. एस. डी. पाटील, डॉ. पी. के. देशमुख , प्रा. वी. के चटप, डॉ. एल. आर. झंवर, प्रा. विजय पाटील, पराग पाटील, हिम्मत पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.