पर्यावरण संवर्धन समितीचा आरोप
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका वेबसाईटवर देण्यात येणारी महापालिकेतील सर्व अधिकृत माहिती ही महापालिका आयुक्त यांच्या अधिकारात प्रसिद्ध केली जाते. तीच माहिती सत्य मानली जाते. मात्र उद्यान विभागाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पत्रकामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांची यादी देण्यात आली आहे. मात्र अशी कोणतीच यादी महापालिकेच्या वेबसाईटवर दिसून येत नाही. त्यामुळे ही यादी कायदेशीर नाही, असे मत पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी व्यक्त केले. याबाबत मुख्य उद्यान अधिक्षक तथा वृक्ष अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
अभ्यासक व्यक्तींचा समावेश नाही
या निवेनदनात म्हटले आहे की, 24 व्या वृक्षारोपण व प्रदर्शन कार्यक्रमाच्या माहिती पत्रकात प्रसिद्ध केलेल्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांची यादी ही कोठेही महापालिका वेबसाईट वर उपलब्ध नाही. त्यामुळे आपण ही यादी बनावट छापली आहे असे वाटते. छापलेल्या सदस्य यादीत सर्व 13 जण हे विद्यमान नगरसेवक आहेत. यामध्ये तज्ञ व अभ्यासक व्यक्तींचा समावेश नाही. सात नगरसेवक नियमानुसार आहेत व उरलेले सहा सदस्य कोठून व कोणी नियुक्त केले याबाबत खुलासा करावा. आपणास समिती स्थापनेचा संपूर्ण कायदेशीर अनुभव व ज्ञान आहे. ही चूक दुरूस्त न झाल्यास महापालिका आयुक्तांकडे याबाबत निवेदन द्यावे लागेल.