वृक्ष लागवडीसाठी आलेली हजारावर रोपे बोरावल खुर्दला पडून

0

यावल- महाराष्ट्र शासनाने 18 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गावोगावी ग्रामपंचायत नगरपालिका, विविध संस्था आणि शासकीय खात्यामार्फत वृक्ष लागवड करून साध्य करायचे आहे. या कामासाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर रोपांचे वाटप प्रत्येक तालुकास्तरावर करण्यात आले आहे तर गावो-गावी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा गजर केला असताना यावल तालुक्यातील बोरावल खुर्द ग्रामपंचायतीने मात्र वृक्ष लागवडीच्या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. सुमारे 20 दिवसांपासून बोरावल खुर्द ग्रामपंचायतीकडे हजार ते बाराशे वृक्षांची रोपे आणल्यानंतरही त्यांची लागवड करणे तर सोडा या रोपांना एका खाजगी जागेत टाकून देण्यात आले तर त्यातील बरीचशी रोपे गुरा-ढोरांनी खाल्ली आहेत तर काही रोपे पडून-पडून खराब झाली आहेत.

बोरावल खुर्द ग्रामपंचायतीची मनमानी
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीसाठी सारखा महत्त्वाचा विषय शासन हाताळत असताना बोरावल खुर्द ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक लागवडीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. समाधानकारक पावसाची हजेरी असतानाही ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीचा मुहूर्त कधी मिळणार ? याकडे संपूर्ण बोरावल खुर्द नागरीकांचे लक्ष लागून आहे. वृक्ष लागवड अद्याप का झालेली नाही ? याबाबत वरीष्ठांनी पंचायत समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत