वृक्ष लागवड व संवर्धन फिरता चषक स्पर्धा 2018

0

भुसावळातील संस्कृती फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

भुसावळ- पावसाळ्यात व्यापक स्वरूपात वृक्षारोपण होण्याच्या अनुषंगाने संस्कृती फाउंडेशनतर्फे वृक्ष लागवड व संवर्धन चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत शहरातील गणेश मंडळ, सामाजिक संस्था, नगरसेवक, ज्रूेष्ठ नागरीक भाग घेऊ शकतात. ही स्पर्धा भुसावळ शहर व ग्रामीण अशा दोन विभागात असून स्पर्धेत शहरातील तथा ग्रामीण भागातील एका प्रभागामध्ये अधिक वृक्षारोपण करणार्‍या मंडळ, सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक यांना आमदार संजय सावकारे यांच्या दिला जाणार आहे. स्पर्धेचा शुभारंभ 1 जुलै पासून करण्यात आला. स्पर्धेचे तीन टप्प्यात आयोजन करण्यात आले आहे.

असे आहे स्पर्धेचे स्वरूप
1 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत वृक्षारोपण करून त्याचे छायाचित्र संबंधीत मोबाईल क्रमांकावर टाकावे. 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत वृक्षरोपांचे संवर्धन करायचे असून या उपक्रमाचा शेवटचा टप्पा 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असणार आहे. यामध्ये वृक्षरोपांची परीक्षकांतर्फे पाहणी केली जाणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण व शहरी भागातून एक अशा दोन वृक्षारोपण व संवर्धन फिरता चषकाचे वितरण केले जाणार आहे. उपक्रमात आमदार संजय सावकारे यांचादेखील सहभाग असून या उपक्रमातून शहर व तालुकाभरात व्यापक स्वरूपात वृक्षारोपण केले जाणार आहे. शहर व तालुक्यातील सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक, गणेश मंडळे यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांकडून नागरीकांमध्ये सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली जात आहे.

असे आहे उपक्रमाचे ब्रीदवाक्य
‘आपण सर्व चालवू चळवळ, लावूया वृक्ष करूया हिरवळ’ असे ह्या उपक्रमाचे ब्रीद आहे. शहरातील भिरुड कॉलनी, प्रभात कॉलनी, शिवाजी नगर, प्रोफेसर कॉलनी व तालुक्यातील वराडसीम, कुर्‍हा, खडका, कंडारी व यावल तालुक्यातील अंजाळे , अकलूद, इत्यादी गावांची नोंदणी झालेली आहे.

नागरीकांना पर्यावरणाचे महत्व समजणार
उपक्रमातून शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांना पुरस्काराच्या दृष्टीने पर्यावरणाचे महत्व समजणार आहे. तसेच व्यापक वृक्षारोपण चळवळ निर्माण होऊन यंदाच्या पावसाळ्यात अधिक प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी यासाठी संस्थेतर्फे हा अद्वितीय उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्कृती फाउंडेशन अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत म्हणाले.