जळगाव : सेवानिवृत्तची रक्कम काढण्यासाठी आलेल्या वयोवृध्दास हेरुन दोन महिलांनी 17 हजार लांबविल्याची घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. बँकेमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी असतांना नवीपेठेतील बँक ऑफ इंडिया या शाखेत ही घटना घडल्याने बँकामधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. बँकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये दोन संशियीत महिला कैद झाल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी वृध्दाने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिविठ्ठलनगरमधील व्यंकटेश्वर नगरात तुरेबाज बलदार तडवी (वय-76) हे राहतात. महाराष्ट्र जिवन प्राधीकरणामध्ये ते शिपाई म्हणुन सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्ती नंतर मिळणारे वाढीव पेंन्शनची रक्कम काढण्यासाठी तडवी शहरातील नवी पेठमधील बँक ऑफ इंडिया या शाखेत गेले होते. 12.53 वाजता त्यांनी 17 हजाराची रक्कम काढली. यात त्यांना दोन हजाराच्या सात व शंभरच्या 30 नोटा असे एकुण 17 हजार रुपये मिळाले. पैसे मोजल्यानंतर ते जवळच असलेल्या पाच बुक प्रिंटरमशिनजवळ पास बुक प्रिंट करण्यासाठी गेले. याठिकाणी दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिश्यातुन 17 हजाराची रोकड लांबविली. बँक बाहेर निघत असतांना हा प्रकार तडवी यांच्या लक्षात आला. तडवी यांनी लागलीच वरिष्ठ शाखा प्रबंधक ए.डब्ल्यु. जहाँगिरदार यांची भेट घेवून हकिकत कथन केले. जहाँगिरदार यांनी शहर पोलीसांत जाण्याचा सल्ला वृध्दास दिला. तडवी यांनी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेहळणी करुन लांबविली रक्कम
बँकेमध्ये कोणतेही काम नसतांना सुरक्षा रक्षक नसल्याची संधी महिलांनी साधली. वयोवृध्द असलेले तडवी यांनी रक्कम काढल्यानंतर ते पासबुक प्रिंटर मशिनजवळील सोफ्यावर पैसे मोजत होते. यावेळी दोन महिला त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे कॅमेर्यांमधील चित्रणावरुन दिसत आहेत. या दरम्यानाच तडवी यांच्या खिशातून पैसे चोरीला गेले. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर शहर पोलीस स्टेशन गाठत अज्ञात चोर÷ट्यांविरूध्द फिर्याद दाखल केली.
बँकेतील सुरक्षारक्षक गैरहजर
बँकेतील सुरक्षारक्षक सुटीवर होते. बँकेत सुरक्षेच्या दृष्टीने 8 कॅमेरे लावण्यात आले आहेत. तडवी हे वयोवृध्द असल्याने पैसे काढण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन केले. दोन मुली संशयित वाटत असुन शहर पोलीसांना सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज चौकशीसाठी दिले असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ शाखा प्रबंधक ए. डब्ल्यु जहाँगिरदार यांनी दिली.
बँकेत एकटे न जाण्याचा दिला होता सल्ला
एसटी महामंडळमध्ये वाहक म्हणुन तडवी यांचा मुलगा विनोद तडवी कार्यरत आहेत. त्यांनी बँकेमध्ये सेवानिवृत्तीची रक्कम काढण्यासाठी घरातील कोणाला तरी सोबत घेवुन जाण्याचा वडिलांना सांगितल्याचे विनोद तडवी यांनी सांगितले.