विमा कंपनीकडून एक कोटी 61लाख फंड देण्याचा बनाव
पिंपरी-चिंचवड : आमच्या विमा कंपनीकडून तुम्हाला 1 कोटी 61 लाख रुपयांचा फंड देण्यात येणार आहे. त्यासाठी जीएसटी, सरकारी टॅक्स आणि प्रोसेस फी भरावी लागेल, असा बनाव करून एका ज्येष्ठ नागरिकाची 39 लाख 36 हजार 304 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2017 ते मे 2018 दरम्यान घडला. या प्रकरणी प्रभाकर यादव देशमुख (वय 65) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल सक्सेना, रमण कुमार झा आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध करापोटी उकळले पैसे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2017 मध्ये आरोपींनी प्रभाकर यांना वेळोवेळी फोन करून आर. बी. आय. इन्शुरंस फंड रिलीजींग विभागातून बोलत असल्याचे भासवले. तसेच प्रभाकर यांना 1 कोटी 61 लाख रुपयांचा फंड देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना जीएसटी, सरकारी टॅक्स, आणि ट्रांजेक्शन फी अगोदर भरावी लागणार आहे. सर्व प्रकारची रक्कम भरल्यानंतर फंडाची पूर्ण रक्कम प्रभाकर यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार प्रभाकर यांनी बँकेमध्ये वेळोवेळी 39 लाख 36 हजार 304 रुपये जमा केले.
महिलेसह दोघांवर गुन्हा
पैसे जमा करून देखील त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच प्रभाकर यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार तिन्ही आरोपींवर माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क) (ड) तसेच भारतीय दंड संहिता कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.