पोलीस कोठडीचा हक्क राखून कारागृहात रवानगी
जळगाव : अमळनेर येथील 55 वर्षीय महिलेला सावखेडा शिवारातील जंगलात नेऊन मारहाण व अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाजया फारुख मजीद भीस्ती (30, रा.आझादनगर, हुडको पिंप्राळा) याच्याविरुध्द सोमवारी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा तसेच बळाचा वापर करुन विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याचे वाढीव कलम लावण्यात आले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील व जितेंद्र पाटील यांनी फारुख मजीद भीस्ती याला अटक करुन रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी रात्री पावणे नऊ वाजता भीस्ती याला अटक करण्यात आली. पीडित महिलेचा जबाब व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासाधिकारी रोहीदास ठोंबरे यांनी या गुन्ह्यात कलम 307 व 354 ब हे दोन वाढीव कलम लावले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीचा हक्क राखून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
तीन महिन्यांपूर्वीच्या घटनेत सहभागाबाबत चौकशी
या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण तयार झाले. दिवसाढवळ्या महिलांना रिक्षात बसवून ओसाड जागेत नेण्याच्या घटना असो कि तरुणींची छेडखानी यामुळे कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो, मात्र अशा घटनेनंतर तात्काळ गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आल्याने पोलिसांविषयी आदर निर्माण होऊ लागला आहे. फारुखच्या अटकेनंतर महिलेच्या मुलीने समाधान व्यक्त केले. दरम्यान, तीन महिन्याआधी देखील सावखेडा शिवारात एका वृध्देला नेऊन मारहाणीची घटना घडली होती, त्यात भीस्तीचा सहभाग आहे किंवा नाही याची चौकशी पोलीस करीत आहेत.