यावल रस्त्यावर खड्डे चुकवताना अपघात : रस्त्यांची दुर्दशा थांबवण्याची अपेक्षा
यावल- यावल-भुसावळ रस्त्यादरम्यान वेगवेगळ्या तीन अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली तर यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्डे चुकवण्याच्या नादात हे अपघात झाले. तीन दुचाकी पाचशे मीटरच्या अंतरावर वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी पडल्या तर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमींना यावल शहरातील काही तरुणांनी पुढाकार घेऊन रुग्णालयापर्यंत पोहोचवलं तर यातील दोघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
खड्डे चुकवताना झाला अपघात
शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सुपडू बाळू सोनवणे (रा.फोपणार) हा दुचाकी (एम.पी. 68 एम.डी.8118) या दुचाकीवरून भुसावळकडून यावलकडे येत असताना यावल शहराबाहेर निमजाय माता मंदिराजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवण्याच्या बेतात वाहनावरील त्याचा तोल गेला व रस्त्यावर तो आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला असतानाच त्याचवेळी हतनूर कालव्याजवळ बाबूराव भमराव कोळी (सांगवी खुर्द ) हे दुचाकी (एम.एच.19 ए.ए.9035) द्वारे यावलकडून सांगवीला जात असताना खड्डा चुकवताना अचानक त्यांच्या दुचाकीसमोर कुत्रे आलं आणि ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या विजय प्रकाश कोळी (19) हादेखील किरकोळ जखमी झाला. बाबुराव कोळी यांना डोक्याला, तोंडाला हातापायाला गंभीर दुखापत झाली तसेच यावल शहरातून दुचाकीद्वारे भुसावळकडे जात असतानाच निमजाय माता मंदिराजवळील खड्ड्यांना चुकवत असताना राहुल गोकुळ कोळी (21), विशाल रवींद्र बारी (23, दोघं रा.यावल) हेदेखील रस्त्यावर पडले व त्यांना किरकोळ दुखापत झाली. सुपडू सोनवणे आणि बाबुराव कोळी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.अमिर तडवी, डॉ.उमेश कवडीवाले, पल्लवी सुरवाडे, विजय शिंदे, चंद्रकांत ठोके यांनी प्रथमोपचार केले व दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारार्थ हलवले. दरम्यान, अपघात झाल्यानंतर सर्वच जण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले असताना नावरे येथील सरपंच समाधान पाटील, यावल शहरातील दीपक मंडवाले, नकुल माळी आदी तरुणांनी पुढाकार घेऊन जखमींना तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.