भुसावळ । वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये भुसावळ विभागात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घोडसगाव शिवारात शॉक लागल्याने शेतकर्याचा लंगडाआंबा कार्यक्षेत्रात वनरक्षकाचा ट्रॅक्टर दरीत पडल्याने तसेच कोचूरच्या इसमाचा विहिरीत मृतदेह आढळला. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घोडसगावात शॉक लागून शेतकर्याचा मृत्यू
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारात भास्कर नारायण ठाकरे (54) या शेतकर्याचा श्रीकृष्ण घोंगरे यांच्या शेताजवळ इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12.45 वाजेपूर्वी घडली. याबाबत राजेंद्र सांगळकर यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय माणिक निकम करीत आहेत.
ट्रॅक्टर दरीत कोसळले, वनरक्षकाचा मृत्यू
लंगडाआंबा वनकार्यक्षेत्रात ट्रॅक्टर 200 फूट दरीत कोसळल्याने वनरक्षक विनोद गणेश कांबळे (28 ह.मु.लंगडाआंबा, मुळ रा.विलोली, नांदेड) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजू नजीर तडवी (पाल) यांनी खबर दिल्यावरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कोचूरच्या बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला
रावेर तालुक्यातील कोचूर बु.॥ येथील जितेंद्र गजानन बिजागरे (24) या तरुणाचा शनिवारी कोचूर-चिनावल रोडवरील सार्वजनिक विहिरीत मृतदेह आढळला. गेल्या 20 तारखेपासून हा तरुण बेपत्ता असल्याने सावदा पोलिसात नोंद करण्यात आली होती. गणेश श्रावण लांडगे (वरणगाव) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय नामदेव चव्हाण करीत आहेत. तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय आहे.