वेडवहाल गावात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

0

वासिंद : मुंबई महानगरातील कोट्यवधी रहिवाशांना पाणीपुरवठा करणार्‍या तानसा जलवाहिन्या लगत असलेल्या वेडवहाल या गावाला वीजपुरवठा करणार्‍या ट्रान्सफॉर्मरचाचा बुधवारी सायंकाळी आग लागून स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने वेडवहाल गावातील ग्रामस्थ भितीने घराबाहेर निघून इतरत्र पळू लागले. या आगीत ट्रान्सफॉर्मरचा व वीजवाहिन्या संपूर्ण जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे वेडवहाल गावातील एक हजार लोकवस्ती असलेल्या गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील लोकांना ऐन पावसाळ्यात अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

शहापूर तालुक्यातील अघई या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर तानसा जलवाहिन्या लगत वेडवहाल हे गाव वसलेले आहे. बुधवारी शेतीची काम उरकून येथील गावकरी सायंकाळी घराकडे परतली होती. या गावात अचानक स्फोट झाल्याचा प्रचंड मोठा आवाज ऐकून वेडवहाल पलीचापाडा गावातील अबाल वृद्ध, महिला, पुरुष घाबरून सैरवैर घराबाहेर धावत सुटले. यावेळी हा स्फोट नेमका कसला झाला आहे हे ग्रामस्थांनी घराबाहेर आले असता गावालगत असलेल्या एका ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन तो जळत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनात आले. या ट्रान्सफॉर्मरमधून परिसरातील गावांना वीज पुरवठा होतो.

सुरक्षाचौकी अंधारात
या घटनेत ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिन्या जळाल्याने परिसरातील एक हजार लोकवस्ती असलेल्या वेडवहाल, पलीचापाडा, डिंभे, भोयेपाडा या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे तानसा जलवाहिन्यांची सुरक्षा करणार्या मुंबई महानगरपालिकेची मोहिली सुरक्षाचौकी देखील अंधारात आहे. या घटनेची सखोल चौकशीची मागणी होत असून येथे प्रशासनाने त्वरीत वीजपुरवठा सुरु करण्यासाठी नवीन टान्सफॉर्मर बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.