अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा इशारा
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा व मुक्ताईनगर येथील स्वस्त धान्य गोडाऊनमध्ये काम करणार्या कामगारांचे हमालीचे आठ महिन्यापासुन वेतन रखडल्याने त्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. वेतन त्वरीत न मिळाल्यास धान्य गोदाम परीसरातच अंगावर केरोसीन टाकून आत्मदहन करण्याचा इशारादेखील कामगारांतर्फे देण्यात आला.
तहसीलदारांना निवेदन
प्रभारी तहसीलदार मनोज देशमुख यांना कामगारांनी निवेदन दिले आहे. मुक्ताईनगर येथील 10 कामगार तसेच कुर्हा येथील 11 कामगार अशा एकूण 21 कामगारांच्या हमाली (मजुरी ) चे वेतन तब्बल आठ महिन्यांपासून रखडले आहे. भुसावळ येथील कामगार ठेकेदार महेंद्र सपकाळे यांनी हे वेतन हेतू पुरस्कर रखडवलेले असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच आमचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यामुळे तीन दिवसांवर येवून ठेपलेल्या रमजान ईद करीता जवळ पैसा नसल्याने ठेकेदाराला विनंती केली असता ते उडवा-उडवीची उत्तरे देत आहे. तहसीलदारांनी या विषयात लक्ष घालून ठेकेदाराला समज द्यावी व आमच्या रखडलेल्या मजुरीची रक्कम तत्काळ मिळावी, अशी आग्रही मागणी मजुरांच्या वतीने करण्यात आली आहे. आंदोलनात कुर्हा व मुक्ताईनगर येथील नासीर शहा, शेख इब्राहिम शेख मातसाब, हसन नुरा, युसूफ खान, नसीर शहा, बिस्मिल्ला शे. जब्बार, साफिक शेख, रशीद पटेल यांच्यासह 21 मजुर सहभागी झाले आहेत.
आंदोलनात तथ्य नाही, ठेका केला रद्द
कुर्हा येथील अधिकृत मजुरांची मजुरी रक्कम 40 हजार त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे तर मुक्ताईनगर येथील मजुर अधिकृत नव्हते त्यामुळे त्यांची मजुरी वेळोवेळी रोखीने देण्यात आली आहे. त्यामुळे या सुरू असलेल्या आंदोलनात तथ्य नाही तसेच 6 जुन रोजी सर्व मजुरांचे हिशोब क्लियर करून मी कुर्हा व मुक्ताईनगर येथील मजुरांचा ठेका रद्द केल्याचे पत्र जिल्हाधिकार्यांना दिले असल्याचे धान्य गोदाम मजुर ठेकेदार महेंद्र सपकाळे म्हणाले.