अकराव्या शतकातील प्राचीन हेमांडपंथी मंदिर : माजी महसूलमंत्री एकथनाथरा खडसे यांच्याहस्ते यात्रोत्सवाचा शुभारंभ
भुसावळ- तालुक्यातील वेल्हाळे येथील गावात यादव कालीन इ.स.अकराव्या शतकातील पुरातन हेमाडपंथी कपिलेश्वर महादेव मंदिर असून या मंदिराच्या दगडावर कोरीव काम करून बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे या मंदिराचे बांधकामाचे वैशिष्टय वेगळे असून यंदाच्या श्रावण महिन्यापासून या मंंदिराचा ग्रामस्थांनी यात्रोत्सव सुरू करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून भाविकांना यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यादव कालीन प्राचीन मंदिर
इ.स.अकराव्या दशकातील यादव कालीन काळात मंदिराची निर्मिती यादव राजाने केली असून मंदिराच्या बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण कोरीव दगडाचा वापर करण्यात आला आहे. बांधकाम करण्यात आलेल्या मंदिरात एक सभा मंडप असून सभामंडपात चार स्तंभ आहेत. यातील काही स्तंभ नष्ट झाले असून उर्वरीत स्तंभावर देवी-देवतांचे व रक्षकांचे चित्र कोरण्यात आले आहे तसेच मंदिराच्या गाभार्यातील शिवपिंड कदंबपुष्पाकृती आकाराची असून ते शिवशक्ती यंत्रावर आधारीत आहे. यामुळे या मंदिरामुळे वेल्हाळे गावाची प्राचीन काळापासून ओळख निर्माण झाली आहे. यामुळे गावातील नागरीकांनी एकत्र येवून अशा प्राचीन मंदिराचा यंदाच्या श्रावण महिन्यापासून यात्रोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून पहील्या श्रावण सोमवारी 13 ऑगष्टपासून यात्रोत्सवाला सुरूवात केली जाणार आहे.
यांच्याहस्ते होईल यात्रोत्सवाचा शुभारंभ
सोमवार, 13 रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे व मंदिराचे पूजारी स्वामी पंढरीनाथ महाराज, सरपंच सीमा पाटील यांच्या हस्ते यात्रोत्सवाचा शुभारंभ केला जाणार आहे. यासाठी समितीने नियोजन केले असून भाविकांना यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवपिंडीवर पडतात सुर्य किरण
1972 च्या काळात स्वामीजी यांना या मंदिराचा दृष्टांत झाला होता. यामुळे त्यांनी या गावात येवून पाहणी केली असता मंदिराचा दर्शनी भाग वगळता संपूर्ण मंदिर मातीच्या ढिगार्याखाली दाबले गेले होते. यामुळे स्वामींनी गावकर्यांच्या मदतीने मंदिराचा भाग मोकळा केला. वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेल्या 21 जून या कालावधीत मंदिराच्या गाभार्यातील शिवपिंडीवर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या झरोक्यातून सूर्य किरण पडतात. यामुळे या मंदिराचे आगळे-वेगळे महत्व असल्याने भाविक श्रावण महिन्यात या मंदिरातील शिवपिंडीचे दर्शन घेतात. यामुळे वरणगाव नजीकच्या श्री नागेश्वर महादेव मंदिराप्रमाणेच यात्रोत्सव सुरू करण्याचा निर्णय नागरीकांनी घेतला आहे.
यांचा आहे समितीत समावेश
यात्रोत्सव साजरा करण्यासाठी गावातील नागरीकांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष विनायक पाटील, सचिव संतोष कोळी व सदस्य म्हणून विठ्ठल पाटील, शशी पाटील, मूलचंद पाटील, राजेंद्र ठोके, दरबार बेलदार, संतोष गायकवाड, तुषार गोसावी, संदीप पाटील, विजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यात्रोत्सवामुळे या गावातील प्राचीन मंदिराची ख्याती तालुक्यासह जिल्ह्यात पोहोचण्यास मदत होणार असल्याचे समितीने सांगितले.