टाळ मृदुंगाच्या गजरात प्रशासकीय यंत्रणेने केले वृक्षारोपण
भुसावळ- तालुक्यातील वेल्हाळे येथील वनविभागाच्या 10 हेक्टर जागेवर तब्बल 15 हजार 900 वृक्ष लागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. प्रसंगी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘एकच लक्ष्य, 13 कोटी वृक्ष’ या घोषणांनी परीसर दणाणला तर टाळ मृदुंगाच्या गजरात जिल्ह्यातील विविध विभागांच्या हजारो अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
45 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यंदाच्या वर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत 1 ते 30 जुलै दरम्यान जिल्ह्याला 42 लाख 43 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले असले तरी यावर्षी जिल्ह्यात किमान 45 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळर यांनी केला आहे. या संकल्पाच्या पूर्तीसाठी जिल्हाभर जनजागृती करून मोठया प्रमाणात व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे.
यांची होती उपस्थिती
वेल्हाळे येथे झालेल्या कार्यक्रमास जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा परीषदेचे कृषी अधिकारी मधुकर चौधरी, सहायक वनसंरक्षक दसरे, वनपरीक्षेत्र अधिकारी वराडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, भजनीमंडळी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात 17 लाख वृक्षांची लागवड
13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 17 लाख 27 हजार 348 वृक्षांची लागवड करण्यात आली. सर्वाधिक वनविभागाने 11 लाख 11 हजार 234 वृक्षांची लागवड केली आहे तर ग्रामपंचायत विभागाने दोन लाख 53 हजार 210, सामाजिक वनीकरण विभाग दोन लाख 50 हजार 124, वन्यजीव 37 हजार 762, जलसंपदा विभाग 20 हजार 230, कृषी विभागाने 19 हजार 661 वृक्षांची लागवड केली असल्याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.