वेळीच मदत मिळाल्याने वाचले विद्यार्थ्याचे प्राण

0
रावेत बास्केट पूलावरील घटना
चिंचवड : रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या शालेय विद्यार्थ्याला वेळीच मदत मिळाल्याने जीवदान मिळाले. ही घटना रविवारी (दि  1) सकाळी पावणेनऊच्या सुमारास रावेत बास्केट ब्रिज येथे घडली. अभिजित दत्ता जाधव (वय 12, रा. वाल्हेकरवाडी) मुलाचे, तर रघुनाथ  कुदळे (रा. भूमकर वस्ती, वाकड) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.
अग्निशामक जवानांची तत्परता
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित हा सकाळी बास्केट ब्रिज येथे रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी झाला. अपघाताच्या  ठिकाणाहून पिंपरी-चिंचवड अग्निशमन वाहन निघाले होते. त्यांचा समोरच हा अपघात झाल्याने वाहनातील कर्मचारी सुरज गवळी, विशाल  लाडके, प्रतीक जराड यांनी रुग्णवाहिकेला त्वरित संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. शेवटी वाट न पाहता  जवानांनी त्यांच्या अग्निशमन वाहनातूनच त्याला जवळच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. परंतु त्याठिकाणी त्याच्यावर उपचार  होऊ शकले नाही.
स्वत:च नेले दवाखान्यात
त्यामुळे मुलाला पुन्हा प्राधिकरणातील दुसर्‍या खासगी रुग्णालयात घेऊन गेले. अभिजितच्या घरी संपर्क होत नव्हता. त्यामुळे शाळेतून चौक शी करून तो जिथे राहतो त्याच्या घरी अपघाताबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली तोपर्यंत  त्याच्यावर उपचार सुरू झाले होते. गाडी चालक रघुनाथ कुदळे यांनीही या मदत कार्यात जवानांना मोठी मदत केली. वेळीच मदत  मिळाल्याने मुलाला जीवदान मिळाले.