पुणे : वेश्या वस्तीतील महिलांना आता मोफत कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन मिळणार आहे. पुणे विधी सेवा प्राधिकरणातर्फे बुधवारपेठेत ‘लीगल क्लिनिक’ सुरु केले जाणार आहे.
पुणे विधी सेवा प्राधिकरणामार्फत ‘लीगल क्लिनिक’ हा उपक्रम राबविला जात आहे. शहरातील काही महाविद्यालय, येरवडा कारागृह आदी ठिकाणचा यात समावेश आहे. वेश्या वस्तीतील महिलांना मोफत कायदेशीर साह्य करुन देण्यासाठी या भागातही ‘लीगल क्लिनिक’ सुरु करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची प्राथमिक बैठक शिवाजीनगर न्यायालयात प्राधिकरणाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी प्राधिकरणाच्या वकिलांच्या पॅनेलवरील काही वकील, वंचित विकास, सहेली, कायाकल्प, स्वाधार आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेश्या वस्तीतील महिलांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. ‘लीगल क्लिनिक’ करिता जागा मिळविणे आदी विषयावर चर्चा झाली.
प्राधिकरणाचे सदस्य सचिव प्रदीप अष्टुरकर म्हणाले, या क्लिनिकसाठी जागा मिळणे हा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी महापालिकेची मदत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी सुरवातीच्या कालावधीत एक दिवसाआड एक वकील किमान दोन तास बसून, तेथे येणार्या महिलांना कायदेशीर मार्गदर्शन करेल.