वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद

0

पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्सांड्रा मूर विजेती

पुणे : वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्यावतीने आयोजित सिंहगड-राजगड-तोरणा या किल्ल्यांच्या मार्गावरील 50 किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनमधील पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंड देशाची अलेक्सांड्रा मूर यांनी विजेतेपद पटकावले. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या तीन किल्ल्यांवरील मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये तब्बल 5 देश, भारतातील 15 राज्ये आणि 35 शहरातील स्पर्धक सहभागी झाले होते. पुण्यात होणारी ही स्पर्धा युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँकच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली आहे.

सहा देशातील स्पर्धकांचा सहभाग…

स्पर्धेत इंग्लंड, मलेशिया, फिलीपाईन्स, कॅमरुन या देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. शारीरिक आणि मानसिक कस बघणार्‍या या 50 किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनमधील पुरुष गटात 27 वर्षीय विश्‍वास गायकवाड याने बाजी मारली. त्याने ही मॅरेथॉन 6 तास 29 मिनिटे 54 सेकंदांत पूर्ण करून अव्वल क्रमांक पटकावला. बेंगळुरूच्या संतोष के. आणि कुर्गच्या गौरव देवय्या यांनी दुसरा क्रमांक मिळविला. तिसरा क्रमांक शिवाजी माळी याने मिळवला. महिला गटात इंग्लंडच्या अलेक्सांड्रा मूर हिने 8 तास 7 मिनिटे आणि 17 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकाविला. तर पूजा रानी हिने 8 तास 47 मिनिट 46 सेकंद आणि मोनिका मेहता हिने 9 तास 8 मिनिटे अशी वेळ नोंदवित अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचा निकाल

५ 0 किलोमीटर – पुरुष गट – विश्‍वास गायकवाड (6 तास 29 मि. 54 से.), संतोष के., गौरव देवैया (7 तास 21 मि. 40 से.), शिवाजी माळी (7 तास 37 मि. 12 से.) महिला गट – अलेक्सांड्रा मूर (8 तास 7 मि 17 से.), पूजा रानी (8 तास 47 मि 46 से.), मोनिका मेहता (9 तास 8 मि.)

25 किलोमीटर – पुरुष गट – यश राज (3 तास 6 मि. 01 से.), अरुणकुमार (3 तास 8 मि. 25 से.), नवीनकुमार (3 तास 9 मि. 59 से.) महिला गट – नुपूरसिंग (3 तास 16 मि. 12 से.), जागृती गोहिल (5 तास 30 से.), 11 किलोमीटर – पुरुष गट – गणेश पारखे (1 तास 23 मि. 26 से.), विश्‍वेश महाजन (1 तास 39 मि. 27 से.), पवन छावने (1 तास 40 मि. 58 से.) महिला गट – कविता पाटील (1 तास 58 मि. 35 से.), प्रिसिलिया मदान (2 तास 2 मि. 46 से.), विद्या बेंडले (2 तास 11 मि. 50 से.).

खा. सुळे यांच्याहस्ते उद्घाटन…

स्पर्धेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. या वेळी संस्थेचे विश्‍वस्त दिग्विजय जेधे, अनिल पवार, मारुती गोळे, मंदार मते, एव्हरेस्टवीर हर्षद राव, सर्जेराव जेधे, उपस्थित होते. रविवारी सकाळी 6 वाजता सिंहगड पायथ्यालगत गोळेवाडी चौकापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. 50 किलोमीटर शर्यत सिंहगड-राजगड-तोरणा अशी होती. पारितोषिक वितरण समारंभ बुद्धिबळपटू मृणाली कुंटे आणि वेल्हे तालुक्याच्या माजी सभापती निर्मला जागडे यांच्या हस्ते झाला.