वैकुंठ रथासाठी साडेअकरा लाख

0

चिंबळी :- खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील निघोजे गावच्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी वैकुंठ रथासाठी 11 लाख 50 हजार रुपयांचा निधी दिला. निघोज येथील डोंगर, फडके, आल्हाट, बेंडाले, शिंदे, जामदार वस्ती, सुभाषवाडी आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना अंत्यविधीला जाण्यासाठी सुमारे दोन किलोमीटर जाताना पर्यायी वाहनाची व्यवस्था करावी लागते. यासाठी निघोजे ग्रामपंच्यातीच्या वतीने वैकुंठरथ मिळण्यासाठी मागणी केली होती.

या मागणीची वेळोवेळी दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्य शिला शिंदे व माजी उपसरपंच हिरामण येळवंडे यांनी खासदार आढळराव यांच्याकडे पाठपुरावा केल्याने खासदार आढळराव यांनी ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन वैकुंठ रथासाठी 11 लाख 50 हजार रुपये निधी दिल्याचे पत्र मिळाले असल्याची माहिती निघोजे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता येळवंडे यांनी दिली. याप्रसंगी निलम येळवंडे, उपसरपंच संतोष येळवंडे, पोलीस पाटील राहूल फडके, ग्रामपंचायत सदस्य सागर येळवंडे, अनिल येळवंडे, कैलास येळवंडे आदी उपस्थित होते.