वैद्यकिय सल्ल्यानुसार पंड्याला विश्रांती

0

नवी दिल्ली । श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान हा संघ दोन सामन्यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. या संघात करण्यात आलेला महत्वाचा बदल म्हणजे हार्दिक पंड्या. भारतीय संघातील फॉर्मात असलेला क्रिकेटर हार्दिक पंड्याला पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. भारत दौर्‍यात श्रीलंकेचा संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. 24 डिसेंबरला हा दौरा संपेल. श्रीलंका विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात हार्दिक पंड्याला निवडण्यात नाही आले. यामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. सोशल मीडियावर हार्दिकच्या चाहत्यांनी बीसीसीआय, मार्गदर्शक रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीला टॅग करत अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. पांड्या ऑलराउंडर आहे मग का त्याला संघामध्ये सामील करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

जास्त सामने खेळल्याने विश्रांती
बीसीसीआयच्या संकेतस्थळानुसार, हार्दिक पांड्याला रोटेशन पॉलीसी अंतर्गत संघामधून बाहेर करण्यात आले नाही. तर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. त्याला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत संकेत स्थळावर लिहिले की, गेल्या काही दिवसांपासून हार्दिकने खूप सामने खेळले आहेत. डॉक्टरांनी त्याला सतत न खेळण्याचा सल्ला दिला आहे. सतत सामने खेळल्याने अशा खेळाडूला दुखापती होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. या दरम्यान हार्दिक बंगळुरूच्या फिटनेस अकादमीत आपल्या फिटनेसवर काम करणार आहेत.

दिनेश चंडीमलचा पहिलाच भारत दौरा
श्रीलंका 2009 नंतर भारतात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारतात श्रीलंकेची कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाही. आतापर्यंत ते भारतात 17 कसोटी खेळले आहेत. त्यापैकी 10 सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. तर 7 सामने अनिर्णित राहिले. श्रीलंकेच्या संघाने भारताविरुद्ध अधिकृतरीत्या कसोटी सामने खेळण्यास 1982पासून प्रारंभ केला. परंतु लंकेला भारतात गेल्या 35 वर्षांत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही, मग मालिका जिंकणे दूरच राहिले. त्यामुळेच भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळविणे हे येथे येणार्‍या प्रत्येक पाहुण्या संघाचे, कर्णधाराचे स्वप्न असते. हे आव्हान किती अवघड आहे हे माहीत असूनही आपण त्याच स्वप्नाचा पाठलाग करणार आहोत, असे चंडीमलने सांगितले. रविचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा हे जगातील अव्वल गोलंदाज असून त्यांना तोंड देण्यासाठी आपल्या संघाने वेगळे डावपेच आखले असल्याची माहिती चंडीमलने दिली. कर्णधार दिनेश चंडीमलसाठी हा दौरा नक्कीच कठीण असणार आहे. भारतीय भूमीत तो पहिली कसोटी खेळणार आहे.

पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ –
विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, वृद्धिमन साहा, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार, इशांत शर्मा.