वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्तच

0

यावल । यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे प्रत्यक्षात रिक्त असली तरी तांत्रिकदृष्ट्या ती भरलेली दिसतात. यामुळे एकीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाच वैद्यकीय अधिकारी देताना ग्रामीण रुग्णालयातील हा तिढा सुटणे अपेक्षित होते, असा सूर उमटत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून तीन वर्षे झाली. मात्र, उपजिल्हा रुग्णालयाच्या पद्धतीने सोयी-सुविधा, पदभर्ती अपेक्षित असताना ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जा नुसारची मंजूर पदे देखील भरलेली नाहीत. प्रामुख्याने वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयास घरघर लागली आहे. सध्या या रुग्णालयात एकच कराराधीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. मात्र, हे डॉक्टरदेखील या महिन्यापर्यंतच यावलमध्ये असतील. यानंतर येथील सेवा पूर्णपणे ठप्प होऊ शकते.

कागदपत्रावर तीन मात्र प्रत्यक्षात एकच अधिकारी कार्यरत

ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गौरव पाटील यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी राजीनामा दिला होता. मात्र, तो अद्यापही मंजूर झालेला नाही. यानंतर पुन्हा सप्टेंबर 2016 रोजी त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव गेला. त्यावरही आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी निर्णय घेतलेला नाही. तसेच डॉ. अतिया सय्यद यांची बंधपत्रावर नियुक्ती होती. त्यांचा कार्यकाळ 11 जून 2016 रोजी संपला. मात्र, त्यांनी मध्यंतरी 40 दिवस सुटी घेतली होती. हा सुटीचा कार्यकाळ पुन्हा सेवा देऊन पूर्ण केल्यावर त्यांची कायदेशिर बदली होईल. या दोन तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण रुग्णालयात कागदावर तीन वैद्यकीय अधिकारी दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र एकच कार्यरत आहे.

प्रशासकीय पातळीवरील समस्या सुटण्याची गरज

विशेष म्हणजे यावल ग्रामीण रुग्णालयावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला ग्रामीण भाग आणि आदिवासी बांधवांची आरोग्यसेवा अवलंबून आहे. या रुग्णालयात मंजुरीनुसार अजून दोन वैद्यकीय अधिकारी गरजेचे असताना प्रत्यक्षात रिक्त असलेल्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे तांत्रिकदृष्ट्या भरलेली दिसतात. ही प्रशासकीय पातळीवरील समस्या सुटल्यास वैद्यकीय अधिकारी मिळणे सोपे होईल. मात्र, त्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हा शल्यचिकित्सक पुढाकार घेण्यास तयार नाहीत.

लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे

तालुक्यातील भालोद आणि साकळी येथे प्रत्येकी 2, तर सावखेडासिम येथे अशा या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. सोबतच यावल ग्रामीण रुग्णालयात देखील वैद्यकीय अधिकारी मिळावे, अशी मागणी आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास गोरगरिबांना वेळेवर उपचार मिळतील.

गरजूंना आर्थिक झळ

दरम्यान वैद्यकिय अधिकार्‍यांच्या कमतरतेमुळे आहे त्या कर्मचार्‍यांच्या आधारावरच संपुर्ण रुग्णालयाचा गाडा ओढावा लागतो. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर अतिरीक्त कामाचा ताण वाढत आहे. पर्यायाने याठिकाणी उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना वेळ देता येत नसल्यामुळे नाईलाजास्तव गरजू व गोरगरीब रुग्णांना शहरातील इतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत असते. त्यामुळे त्यांना देखील आर्थिक झळ सहन करावी लाागत असते. गरजूंना उपचार घेणे शक्य होण्यासाठी लवकरात लवकर रिक्त जागा भरण्याची गरज आहे.