वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीची ‘ती’ अट रद्द

0

पुणे । महापालिकेच्या येरवडा येथील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय तसेच सोनावणे प्रसुतीगृहात नवजात अर्भक अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. या निविदेत सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयांच्या या साहित्य खरेदीसाठी आरोग्य विभागाने अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाची परवानगी असण्याची सक्तीची केली होती. ही अट एका ठराविक कंपनीसाठीच घातल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने ही अट बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे शुध्दीपत्रक प्रसिध्द केले जाणार असून निविदा भरण्यास सात दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असल्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

निविदेसाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत
या निविदा भरण्यासाठी 22 डिसेंबर ही अंतिम मुदत होती. त्यानंतर तातडीने त्या खुल्या केल्याची शक्यता या प्रकारामुळे नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने ही निविदा भरण्याची मुदत संपण्या आधी निविदेमधील अमेरिकन मान्यतेची अट काढावी अशी मागणी सजगने केली होती. त्यानुसार, या निविदा भरण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. आता निविदा भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत असेल.

चौकशीची मागणी
पालिकेच्या काही रूग्णालयांमध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची यंत्रणा उत्तम काम देत आहे. इतकेच नव्हे तर भारतीय कंपन्यांची वैद्यकीय उपकरणे अनेक देशांमध्ये निर्यातही होत असून ती अमेरिकन कंपन्यांपेक्षा 30 -40 टक्क्यांनी स्वस्तही आहेत. परंतु मनपाच्या आरोग्य विभागाने ही अनाकलनीय व अनावश्यक अट टाकून स्पर्धा तर कमी केली आहे. शिवाय ही यंत्रणा महागही मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या मेक इन इंडीया या महत्वाकांक्षी योजनेला हरताळ फासण्याचा घाट महापालिकेकडून सुरू असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.