पुणे । पुणे महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या महाविद्यालयाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध विभागातील सहा अधिकार्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी 25 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे हे महाविद्यालय प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रशासनानेही पावले उचलली आहेत. बंडगार्डन रस्त्यावरील डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारात हे महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. या वैद्यकीय महाविघालयाचा आराखडा तयार करताना विविध विभागांचा समन्वय साकारणे गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकार्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यात आरोग्य अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, भवन विभाग प्रमुख, मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचे प्रमुख, विधी विभाग प्रमुख आणि नगर अभियंता यांचा समावेश आहे.
या महाविद्यालयाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय) याबाबत पत्र पाठवून या महाविद्यालयासाठी मंजुरी घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचेही स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि परिचारिका महाविद्यालय असावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. या मागणीला आता मुर्त स्वरुप मिळण्यास सुरुवात झाली आहे.