वैद्यकीय व्यवसाय हा धंदा बनला आहे

0

ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे प्रतिपादन : ‘माझी गोष्ट’ आत्मकथनाचे प्रकाशन

पुणे : वैद्यकीय व्यवसाय हा आज व्यवसाय न राहता धंदा बनला आहे, आणि तरीही प्रामाणिक, मार्गदर्शक डॉक्टर या व्यवसायात आहेत. या प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिकात डॉ. लीला गोखले यांचे स्थान अतिशय वरचे आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी काढले. शतायुषी स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. लीला गोखले-रानडे यांच्या ‘माझी गोष्ट’ या आत्मकथनाचे व ई-बुकचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुभाष काळे, मौज प्रकाशनचे संजय भागवत, श्रीकांत भागवत, मोनिका गजेंद्रगडकर, अतुल गोखले, अनिता बेनिंजर-गोखले, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे उपस्थित होत्या.

आरोग्य विषयाकडे दुर्लक्ष

एक स्त्री डॉक्टर किती मोठे काम करू शकते याचे दर्शन डॉ. गोखले यांच्या पुस्तकातून होते. त्या आज 101 वर्षांच्या असल्याने 19 व्या व 20 व्या शतकाचे प्रतिबिंब या आत्मकथनात पडले आहे. आजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना हे पुस्तक वस्तूपाठ म्हणून उपयोगी ठरेल. सुविधा नसलेल्या प्रतिकूल काळात गोखले यांच्या पिढीने अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय केला, असे नगरकर यांनी सांगितले. आरोग्य या विषयाकडे शासनाचे प्रथमपासून दुर्लक्ष आहे. वाढत्या लोकसंख्येच्या भयानक धोक्याबाबत कोणताही पक्ष बोलत नाही, अशा पार्श्‍वभूमीवर डॉ गोखले यांनी कुटुंबनियोजनाचे काम आणि स्पष्ट विचार महत्त्वपूर्ण ठरतात, असे डॉ. काळे यांनी सांगितले.