३०२ कोटी रुपयांचे वितरण केले असल्याची माहिती
मुंबई – मुख्यमंत्री सहायता निधी हा राज्यातील अनेक रुग्णांसाठी वरदान साबित झाला आहे. मागील ३ वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून २८ हजार रुग्णांवर ३०२ कोटी रुपयांचे उपचार करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली. राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची अतिरिक्त जबाबदारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. कॅन्सर सारख्या रोगावर देखील उपचारासाठी मदत केली जात असल्यामुळे मु्ख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रोज या विभागाकडे येणाऱ्या अभ्यागतांची संख्या देखील दिवसेंदिवस आहे.
१३ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या ओमप्रकाश शेटे यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. विभागाकडून आत्तापर्यंत ३०२ कोटी रूपये रूग्णांना उपचारासाठी दिले आहेत. त्यासोबतच ४५० धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून मागील तीन वर्षात ६०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च हा गोरगरीब रुग्णांवर करण्यात आला आहे. रुग्णांना थेट मदत देण्यासोबतच राज्यातील जवळपास ४५० धर्मादाय रुग्णालयामध्ये १० टक्के खाटावर मोफत उपचार करण्यात येत आहेत.
लहान मुलांच्या शस्त्रक्रिया योग्य वेळी झाल्यामुळे या मुलांना जीवनदान मिळाले आहे. फक्त पैशा अभावी कोणताही लहान मुलगा उपचारापासून वंचीत राहणार नाही. उपचारासाठी कोणाला मदतीची गरज असेल तर गरजूंनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी संपर्क साधावा.
– ओमप्रकाश शेटे