वैभव घुगे यांना पिलर्स ऑफ न्यू इंडिया पुरस्कार

0

 सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल

पिंपरी : मुंबईतील नवभारत आणि वॉयफॉरडी फाऊंडेशनतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पिंपरी शहरातील वैभव घुगे यांचा ‘पिलर्स ऑफ न्यू इंडिया’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मानव आणि संसाधन विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत या पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकुर, भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, वॉयफाॅरडीचे अध्यक्ष प्रफुल्ल निकम, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुमित मलिक, डेक्कन वॉटरचे सीएमडी अर्निबन सरकार, नवभारतचे मुख्य निमिष माहेश्‍वरी उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्राची आवड
वैभव घुगे हे पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे मुख्य समन्वयक तसेच अभंग शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था (वाशिम)चे उपाध्यक्ष आहेत. वडील डॉ. दिलीपराव घुगे यांच्या सामाजिक विचारांनी प्रेरित होऊन त्यांना सामाजिक क्षेत्राची आवड निर्माण झाली. वयाच्या 17 व्या वर्षी अभंग शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था स्थापन करून, त्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व अशिक्षित महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी काम सुरू केले. त्यानंतर गावामधील विविध उपक्रमध्ये सहभागी होऊन ते चांगल्या पद्धतीने कसे होतील यामध्ये हातभार लावणे, शेतक-यांना, मित्रांना कायद्यांचे मार्गदर्शन करणे व त्यांना मदत करून त्यांचे प्रश्‍न मार्गी लावणे, ग्रंथालय चालू करून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत वाचता येतील अशी पुस्तके उपलब्ध करून देणे अशा विविध गोष्टींमध्ये तन-मन-धनाने मदत करून जमेल तेवढे समाजाशी निगडित प्रश्‍न सोडवतात.

सहकार्‍यांमुळे मिळाला पुरस्कार
पुरस्कार मिळाल्याबद्दल बोलताना वैभव घुगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) या संस्थेच्या माध्यमातून मला पिंपरी शहरातील विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणारे सहकारी लाभले. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन प्रत्येक वेळेस मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या सर्व कार्यामधूनच माझी ओळख निर्माण झाली. याचे सर्व श्रेय मी आत्तापर्यंत लाभलेल्या माझ्या सर्व सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ, मार्गदर्शक व मित्र परिवार यांना देतो.