विद्यापीठातर्फे आत्तापर्यंत सव्वादोन कोटी खर्च; अभ्यासक्रमासाठी पाच वर्षांत केवळ 8 विद्यार्थ्यांचा प्रवेश
पुणे : मोठा गाजावाजा करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. पाच वर्षांत या अभ्यासक्रमासाठी अवघे 8 विद्यार्थी मिळाले आहेत. या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाचे आतापर्यंत 2 कोटी 15 लाख खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या वैमानिक अभ्यासक्रमाचा प्रयोग फसल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) येत्या शनिवारी होत आहे. त्यात अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी विद्यापीठाच्या वैमानिक अभ्यासक्रमावरून हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर सदस्य प्रसेनजीत फडणवीस यांनी उत्तर दिले असून, त्यातून या अभ्यासक्रमाची स्थिती समोर आली.
भारतातील पहिलेच विद्यापीठ
विद्यापीठाने 2013मध्ये वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. एम.टेक एव्हिएशन’ असा अभ्यासक्रम सुरू करणारे भारतातील पहिलेच विद्यापीठ म्हणून स्वत:ची पाठही थोपटून घेतली. मात्र, विद्यापीठाचा या अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्काची रक्कम पाहाता विद्यार्थ्यांचा प्रतिसाद थंडावला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षीचे प्रवेश सुरू आहेत. यंदाच्या वर्षी तरी प्रवेश होतील, याविषयी सांशकता आहे.
प्रवेश शुल्क सुमारे 40 लाख रुपये
पहिल्या वर्षी प्रवेश क्षमता 20 एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र प्रवेश शुल्क सुमारे 40 लाख रुपयांच्या आसपास होते. संतोष ढोरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता विद्यापीठाने प्रवेशाची क्षमता 6 इतकी असल्याचे स्पष्ट केले आहे. पहिल्या वर्षी 6, त्यानंतर दोन वर्षांनी 1, पुन्हा दोन वर्षांनी 1 असे एकूण 8 विद्यार्थी पाच वर्षांत वैमानिक अभ्यासक्रमाला मिळाले आहेत. दोन शैक्षणिक वर्षांतही एकही प्रवेश झाले नाहीत. आतापर्यंत विद्यापीठाचे 2 कोटी 15 लाख 7 हजार 548 रुपयांचा खर्च झाल्याचे प्रशासनाने लेखी स्वरुपात स्पष्ट केले. विद्यार्थ्यांकडून आतापर्यंत एकूण शुल्क 26 लाख रुपये जमा झाल्याचे सांगितले आहे. अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाचा खर्च 2 कोटींच्या पुढे गेला आहे.
निर्णय बारगळला
वैमानिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विमान हाताळणीची संधी मिळावी, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने छोटेखानी विमान खरेदी करण्याच्या विचारात होते. त्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. मात्र विमान खरेदीवरून मोठ्या टिकेला सामोरे जाण्याची नामुष्की टाळण्यासाठी विद्यापीठाने विमान खरेदीचा निर्णय मागे घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली