वैयक्तिक फळबाग लागवड योजना शेतकर्‍यांसाठी वरदान

0

तळोदा। लोकसमन्वय प्रतिष्ठाण व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदयातील प्रशासकीय इमारतीतील सभागृहात विविध विभागातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी लोकसमन्वय प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी रामोळे, गटविकास अधिकारी शरद मगर, तालुका कृषी अधिकारी पी. व्ही. भोर, नायब तहसीलदार रीनेश गावित, मंगला पावरा, गटशिक्षण अधिकारी महिरे आदी उपस्थित होते.

फळांची रोपे व कलमे शेतकर्‍यांना देणार
लोकसमन्वय प्रतिष्ठान व कृषी विभागाकडून यांचा संयुक्त विद्यमाने, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण वैयक्तिक फळबाग लागवड ही योजना राबविण्यात येणार आहे. यावेळी प्रतिभा शिंदे यांनी सांगितले की, ही योजना ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी फार उपयुक्त आहे, या योजनेमुळे भविष्यात शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होणार आहे. जैन इरिगेशन यांसारख्या कंपनीने सुद्धा सिताफळ व जांभूळ आदी फळं विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे तरी शेतकर्‍यांनी या योजनेचा जास्तीत लाभ घ्यावा असे यावेळी सांगितले. रामोळे यांनी सांगितले की, कृषी विभागाकडून चांगल्या प्रतीची फळांची रोपे व कलमे शेतकर्‍यांना पुरविण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी करावयाची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी यशवंत ठाकरे, बोखा पावरा, नाथ्या पावरा, माण्या पावरा, राजा वसावे आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

काय आहे योजना?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे 20 गुंठा ( 1/2 अर्धा एकर ) ते 4 एकर पर्यंत शेती असणे आवश्यक आहे. शेतकरी कमीत कमी 20 फळांची तर जास्तीत जास्त 400 फळांच्या रोपांची व कलमांची लागवड त्याचा शेतात करु शकतो, तसेच शेतातील बांध्यावर देखील वृक्ष लागवड करता येणार आहे. त्यांसाठी शेतकर्‍यांनी 5 जून पर्यंत आपापल्या क्षेत्रात खड्डे खणणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, बँकेचा पासबुकची झेराक्स, जॉब कार्ड, सातबारा / वन पट्टा, खाते उतारा, चतुःसीमा आणि शेतकर्‍यांचे अर्ज आवश्यक आहेत. या योजनेत आंबा, लिंबू, नारळ, सिताफळ, आवळा, जांभूळ, बोरं, चारोळी, पेरु, फणस, साग, बांबू, चिक्कू आदी फळांची रोपे व कलमे शेतकर्‍यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच शेतकर्‍यांना खड्डे खणण्या पासून ते 3 वर्षांपर्यंत जो काही खर्च येईल तो सुद्धा कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे.