पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील वैशाली व रुपाली या प्रसिद्ध हॉटेलांचे चालक जगन्नाथ शेट्टी यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे मूळ मालक श्रीधर शेट्टी यांच्या पत्नी अप्पी शेट्टी यांनी 2014 मध्ये दिलेल्या तक्रार अर्जावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
जगन्नाथ होन्नई शेट्टी (रा. मोदी बाग, शिवाजीनगर) व शशेंद्र सुंदर शेट्टी (रा. बाणेर रोड) यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शशिकला श्रीराम शेट्टी (वय 63, रा. क्वार्टर गेट) यांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादी शशिकला शेट्टी या हॉटेल वैशाली आणि रुपालीचे मूळ मालक श्रीधर बाबू शेट्टी यांची मुलगी असून, त्यांना चार मुली होत्या. आरोपी जगन्नाथ शेट्टी हा शशिकला यांच्या आत्याचा मुलगा आहे. तो वयाच्या 19 व्या वर्षापासून श्रीधर शेट्टी यांच्याकडे मोरीकाम म्हणून नोकरीस असल्याचे श्रीधर शेट्टी यांच्या पत्नी अप्पी शेट्टी यांनी शशिकला व त्यांच्या इतर बहिणींना सांगितले होते. श्रीधर शेट्टी यांच्या निधनानंतर जगन्नाथ शेट्टी यांनी अप्पी शेट्टी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हॉटेलचा सर्व कारभार स्वतः पाहण्यास सुरुवात केली. वेगवेगळी कारणे काढून वेळोवेळी जगन्नाथ शेट्टी यांनी अप्पी शेट्टी, शशिकला शेट्टी व त्यांच्या बहिणींच्या स्वक्षर्या घेतल्या. शशिकला यांची मोठी बहिण शकुंतला (त्यावेळी वय 14) हिच्याबरोबर जगन्नाथ शेट्टी यांनी लग्न केले. त्यावेळी जगन्नाथ शेट्टींचे वय 34 होते.
अप्पी शेट्टी यांनी इच्छापत्र करायचे असल्याने सर्व जागांची कागदपत्रे, सोने व चांदी देण्यास जगन्नाथ शेट्टी यांना सांगितले. त्यावेळी जगन्नाथ शेट्टी यांनी कोणतेही कागदपत्रे तसेच सोने देणार नाही, ती सर्व मी माझ्या नावावर केल्याचे सांगितले. हे ऐकून अप्पी शेट्टी यांना धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अप्पी शेट्टी यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे रितसर अर्ज करुन जगन्नाथ शेट्टी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
की तक्रार झाल्याने आपली चूक झाल्याचे मान्य करत जगन्नाथ शेट्टी यांनी दोन कोटी देऊन वैशाली हॉटेल नावावर करुन देतो, पण तक्रार मागे घेण्याची विनंती शेट्टी कुटुंबाकडे केली. त्यानुसार 50 लाखांचे चार धनादेशही दिले. परंतु, त्यातील दोनच धनादेशांचे पैसे जमा झाले. 2016 मध्ये पुन्हा शशिकला यांच्या आई अप्पी शेट्टी यांनी पैसे व जागा नावावर करण्याची मागणी केली. त्यानंतर जगन्नाथ शेट्टी टाळाटाळ करत होते.
दरम्यान, पोलीस आयुक्तांनी तक्रार अर्जाची चौकशी सुरू केली होती. जगन्नाथ शेट्टी यांनी खोटी कागदपत्रे तयार करुन जागा तसेच हॉटेल नावावर केल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार, जगन्नाथ शेट्टी व शशेंद्र शेट्टी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊ असल्याचे भासवले
जगन्नाथ होन्नया शेट्टी, असे जगन्नाथ शेट्टी यांचे पूर्ण नाव आहे. मात्र, हॉटेल नावावर करण्यासाठी त्यांनी मूळ मालक श्रीधर शेट्टी यांचे वडिल बाबू शेट्टी यांचे नाव आपल्या वडिलांच्या जागी लावून जगन्नाथ बाबू शेट्टी अशा नावाने कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांवरुन वैशाली व रुपाली हॉटेल आणि इतर प्रॉपर्टी नावावर करुन घेतल्याचे उघडकीस आले आहे. हॉटेलचे पोलीस लायसन्सही त्यांनी स्वतःच्या नावावर केले आहे.
तक्रार अर्जावरुन गुन्हा
श्रीधर बाबू शेट्टी यांच्या पत्नी अप्पी शेट्टी यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची खडक पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिर्के यांच्याकडून चौकशी करण्यात आली. त्यात आरोपींनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, अप्पी शेट्टी यांची मुलगी शशिकला यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुरुवारी रात्री डेक्कन पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वैशाली व रुपालीचा इतिहास
श्रीधर शेट्टी यांनी 1945 ते 50 या कालावधीत निर्मल भवन, मद्रास कॅफे (आताचे हॉटेल रुपाली) आणि मद्रास हेल्थ होम (आताचे हॉटेल वैशाली) अशी तीन हॉटेल सुरु केली होती. त्यातील एक जंगली महाराज रस्ता आणि रुपाली व वैशाली फर्ग्युसन रस्त्यावर आहेत. 1961 मध्ये श्रीधर शेट्टी यांचे जंगली महाराज रस्त्यावर संशयास्पद अपघाती निधन झाले होते. वैशाली व रुपाली हॉटेलमध्ये असंख्य मान्यवरांची सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे राज्यात नावाजलेली अशी ही हॉटेल आहेत.