वैशाली भोईर यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार!

0

शहापूर । शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षिका वैशाली सुधीर भोईर यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हा शाखा नाशिकच्या वतीने यंदाच्या सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. परशूराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, सुधीर तांबे, नाशिक महापालिकेचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, व्याख्याते भाऊसाहेब चासकर,संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हा शाखा नाशिकच्या वतीने यंदाच्या सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी ऑनलाइन लिंक सह घोषणा करण्यात आली होती. राज्यभरातून शिक्षिकांचे 62 अर्ज आयोजकांकडे आले होते. त्यातील पाच जणांची तज्ज्ञ समितीकडून निवड करण्यात आली होती.

सन्मानचिन्ह, ग्रंथ देऊन गौरव
प्रवरानगर येथील लहिरे सुवर्णा पंडीतराव, हिंगलजवाडी मंजुषा कमलाकर स्वामी, हाताणे येथीलवैशाली बाळासाहेब भामरे, आसनगाव येथील वैशाली सुधीर भोईर, आंबेगण येथील गीतांजली श्रावण भोये या पाच शिक्षकांना परशुराम सायखेडकर नाटयगृह नाशिक येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात सन्मानचिन्ह, ग्रंथ देऊन गौरवण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्काराच्या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील परदेशी भाषा शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार, स्मरणिका प्रकाशन तसेच आजचे शासनाचे शैक्षणिक धोरण व शिक्षकाची भूमिका या विषयावर शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांचे व्याख्यान झाले.