वॉटर ग्रेसवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप

नाशिक । जळगाव शहरातील स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वॉटर ग्रेस कंपनीवर काही दिवसांपासून गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. आता नाशिक महापालिकेतदेखील वॉटर ग्रेसवर घोटाळ्याचे आरोप झाले आहे. विशेष म्हणजे हा विषय सत्ताधारी भाजपाच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला.

नाशिक महापालिकेची निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे, अशात सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांनी वॉटर ग्रेस कंपनीवर केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे बुधवारच्या महासभेत प्रचंड गोंधळ झाला. सत्ताधारी गटाचेच नगरसेवक आरोप करत आहेत म्हटल्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडले आणि त्यांना उत्तरे देताना महापौरांची दमछाक झआली.

नाशिक शहरातील स्वच्छतेचे कंत्राट वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने कर्मचार्‍यांची आर्थिक लूट केल्याचा आरोप महासभेत करण्यात आला. कंपनीने अनेक कर्मचार्‍यांना कामावर घेतले. त्यांना कागदावर दरमहा 20 ते 22 हजार रुपयांचे वेतन दिले. मात्र, कंत्राटदार प्रत्यक्षात केवळ 8 ते 9 हजार रुपये कर्मचार्‍यांना देत असल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला. वॉटर ग्रेस कंपनीचा संचालक हा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निकटवर्तीय आहे, असा आरोप काही नगरसेवकांनी केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले.