वॉण्टेड आरोपी मुकेश भालेराव पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच हिस्ट्रीशीटर व वॉण्टेड असलेला आरोपी प्रकाश भालेराव (25, रा.राहुल नगर, यावल रोड, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून टेक्नीकल हायस्कूलसमोरून शनिवारी अटक केली आहे.

शहर पोलिसांना आरोपी वॉण्टेड
आरोपी मुकेश भालेरावविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात भाग पाच, गु.र.नं. 96/19 भादंवि कलम 143,144,147,427 याप्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात आरोपी पोलिसांना वॉण्टेड आहे शिवाय त्यास दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपारदेखील करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरुन अटक
आरोपी मुकेश भालेराव हा टेक्नीकल हायस्कूलसमोर आल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना मिळाली होती तर शनिवारी बाजारपेठ पोलिसांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात कोविड चाचणी असल्याने तेथे कर्मचारी उपस्थित असतानाच राठोड बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी कर्मचार्‍यांना आरोपीबाबत माहिती देवून कारवाईच्या सूचना केल्या होत्या.

यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक
जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नाईक रवींद्र बिर्‍हाडे, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

आरोपी अट्टल गुन्हेगार
आरोपीविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाणे, भुसावळ तालुका पोलिस ठाणे, फैजपूर पोलिस ठाणे, शनिपेठ पोलिस ठाणे येथे भादंवि 307, 326, आर्म अ‍ॅक्ट 4/25, 3/25 आदी गुन्हे दाखल असून तो भुसावळ शहर पोलिस ठाण्याचा हिस्ट्रीशीटरदेखील आहे.