यावल- शहर व तालुक्यात यावल पोलिसांनी अवैद्य दारू विक्री तसेच गावठी हातभट्टी दारूवर कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यात सुमारे 23 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून त्यातील गावठी दारूचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहायक फौजदार राजेंद्र पाटील, सुशील घुगे, गणेश मनुरे,मुझफ्फर खान, राजेश वाढे, सिकंदर तडवी या पथकाने यावल शहरातील बारी चौकात सुभाष केशव बारी यांच्याकडे धाड टाकली असता त्यांच्याकडे अवैधरीत्या 19 देशी दारूची बॉटल आढळल्या. त्या जप्त करून त्यांना ताब्यात घेतले आहे तसेच अंजाळे येथे तापी नदीच्या काठी भागवत महारु कोळी गावठी हातभट्टीची दारु काढत असताना आढळून आला. त्यास ताब्यात घेत 11 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. त्याचप्रमाणे मोर नदीच्या काठी राजेंद्र भागवत सपकाळे हादेखील गावठी दारू हात भट्टी लावून गाळतांना आढळून आला त्याच्याजवळ अकरा हजार 750 चा माल हा जागीच नष्ट करून त्यातदेखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांवर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.