न्यायालयाच्या आदेशाने 6 जणांविरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल
गहाण ठेवलेल्या मिळकतींचीही परस्पर विक्री
फसवणुकीची रक्कम पोहचली 18 लाखांवर
जळगाव- वेगवेगळ्या नावाने फर्मचे व्यापारी असल्याचे भासवित कर्ज घेवून त्यांची परतफेड न करता गिरणा अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी लि.ची 3 लाख 50 हजारात फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने रविवारी रामानंदनगर पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे संशयितांनी कर्ज घेतेवेळी गहाण ठेवलेल्या मिळकतींचीही बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचे समोर आले आहे.
गिरणा अर्बन को ऑप के्रडीड सोसायटी या पतसंस्थेचे जिल्हा कार्यक्षत्र असून पतसंस्था ही ठेवीदारांकडून ठेवी स्विकारुन, गरजू लोकांना कर्ज वाटप करण्याचे काम करते. या संस्थेचे किशोर भागवत खडसे रा. पंचमेश प्लाझा, गिरणा टाकीजवळ हे सचिव आहेत.
खते विक्रीची दुकाने असल्याचे भासवून घेतले कर्ज
रामकृष्ण ओंकार ढाके यांनी केमीकल ट्रेडिंगचे व्यापारी तसेच राहूल उल्हास चौधरी यांनी मयुर ट्रेडर्स कन्सलटंस नावाने खत विक्रीचा व्यवसाय असून त्यावर लिलाधर नरोत्तम राणे याने हे माकेटींग मॅनेजर असल्याचे भासविले. यानंतर ढाके यांनी पत्नी ज्योती ढके हिला संमतीदार तर राहूल चौधरी व लिलाधर राणे यांना जामीनदार म्हणून उभे करुन पतसंस्थेकडून व्यवसाय वाढीचे कारणासाठी 3 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले.
गहाण मिळकतींचीही केली विक्री
कर्ज घेते वेळी रामकृष्ण ढाके यांनी स्वतःच्या नावे असलेली एरंडोल तालुक्याती पिंप्री येथील गट नं 45 शेतजमीन तर पत्नी ज्योती हिच्या नावे असलेली मेहरुणमधील शेत सर्व्हे 236 अ/2 व 237 यापैकी प्लॉट नं 13 या मिळकती पतसंस्थेजवळ गहाण ठेवल्या. कर्जफेड करत नसल्याने सचिव किशोर खडसे यांनी मिळकती जप्त करण्याची कारवाई केली असता ढाके यांनी बनावट खरेदीखत तयार करुन पिंप्री बुद्रूक येथील गहाण शेतजमीनीची परस्पर विक्री केल्याचे दिसून आले.
सचिवास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
संशयितांनी सदरचे कर्ज परत न केल्याने 31 मार्च 2018 अखेर ही रक्कम व्याजासह 18 लाख 28 हजार 724 वर पोहचली आहे. रकमेची मागणी केली असता सचिव खडसे यांना ढाके याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार खडसे यांनी ढाके विरोधात रामानंद पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. तसेच ढाके हा सराईत गुन्हेगार असून त्याने अशा अनेक पतसंस्थाची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या संशयितांविरोधात गुन्हा
पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्याने सचिव किशोर ढाके यांनी न्यायलयात तक्रार दिली होती. न्यायालयाचे आदेशाने फसवणूकप्रकरणी रामकृष्ण ओंकार ढाके वय 55, ज्योती रामकृष्ण ढाके वय 48 , राहूल उल्हास चौधरी वय 40, तिघे रा.रामदेव अपार्टमेंट एस.एम.आय.टी.कॉलेज समोर जळगाव, लिलाधार नरोत्तम राणे वय 55 रा.राधाकिसनवाडी, जळगाव, महेश पुरूषोत्तम सोमानी वय 50, प्रदीप पुरूषोत्तम सोमाणी, वय 48 दोघे रा. पिंप्राळा यांच्याविरोधात भादंवि 420, 406, 465,468, 471 सह 34 प्रमाणे रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.