जळगाव : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम कॉम्प्लेक्स परीसरातून व्यापार्याचा मोबाईलची चोरी करणार्या भामट्यांना जळगाव गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली आहे. गिरीष गजानन जगताप (24, कुसुंबा मोरया नगर, ता.जि.जळगाव) व सावंत संजय पाटील (19, तुळजाई नगर, पाण्याच्या टाकीजवळ, रा.कुसुंबा, ता.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
व्यापार्याचा लांबवला होता मोबाईल
बळीराम पेठेतील व्यापारी गुरफान उस्मान शेख (33) हे सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये आले. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉम्प्लेक्स मधील जम्बो झेरॉक्स दुकानासमोरुन अज्ञात चेारट्याने त्याच्या खिश्यातून 20 हजारांचा मोबाईल अलगद चोरुन पोबारा केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव गुन्हे शाखेने केली अटक
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, संदीप सावळे, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील, प्रितम पाटील, ईश्वर पाटील आदींनी सापळा रचून तालुक्यातील कुसुंबा बस स्टॉप येथे जावून गिरीष जगताप यास ताब्यात घेतले व चोरीचा मोबाईलही जप्त करण्यात आला तर या चोरीत साथीदार सावंत संजय पाटील हा सहभागी असल्याने त्यासदेखील अटक करण्यात आली. आरोपींना तपासासासाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.