जळगाव। गणपतीनगर परिसरातील ज्योतीनगर हौसिंग सोसायटीतील व्यापार्याचे घर 11 मार्च पासून बंद होते. रविवारी ते गावाहून परत आल्यानंतर त्यांच्या घरात चोरटे घुसल्याचे समोर आले. मात्र घरात चोरण्यासारखे काहीच साहित्य नसल्याने चोरट्यांनी घरा ठेवलेली महागडी दारूची गच्चीवर जाऊन पार्टी केली. त्यानंतर उरलेली दारू बाटलीत तशीच ठेवून पोबारा केला. ज्योतीनगर हौसिंग सोसायटीतील प्लॉट क्रमांक 10 मध्ये किराणा मालाचे घाऊक विक्रेते माधवदास धम्मणदास भोजवानी (वय 62) हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. त्यांचा मुलगा जितेेंद्र भोजवानी हे रायपूर (छत्तीसगड) येथे राहतात. त्यांना भेटण्यासाठी माधवदास भोजवानी 11 मार्च रोजी कुटुंबियांसह रायपूर येथे गेले होते. रविवारी परत आल्यानंतर त्यांच्या दरवाजाचे लॅच लॉक उघडत नव्हते. त्यामुळे त्यांनी चावी बनविणार्याला बोलावले. त्याच्याकडूनही ते लॉक उघडले नाही. त्यामुळे नाईलाजाने लॉक तोडावे लागले.
साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले…
दरवाजा उघडल्यानंतर घरात गेल्यावर त्यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण घरात जाऊन बघितले. तर सर्व खोल्यांमधील साहित्याची फेकफाक केलेली होती. तर तीन ठिकाणी गुटखा खाऊन थुंकलेलेही होते. त्यानंतर चोरटे कोणत्या रस्त्याने आले असतील. त्याचा शोध घेण्यासाठी सर्व गॅलरी तपासल्या. मात्र सर्व दरवाजे बंद होते. त्यामुळे चोरटे लॉक उघडूनच आत आले असल्याचा त्यांना संशय आहे.
चोरट्यांना घरात काहीच सापडले नाही. त्यामुळे घरातील कपाटात ठेवलेल्या महागड्या दारूच्या बाटल्या घेऊन चोरटे गच्चीवर गेले. त्या ठिकाणी दारू प्यायले. त्यानंतर बाटल्या गच्चीवर टाकल्या. तसेच घरात ठेवलेले चॉकलेटही चोरट्यांनी फस्त केले. भोजवानी यांच्या घरात रोख रक्कम तसेच दागिने चोरट्यांना सापडले नाही. त्यामुळे त्यांनी घरातील सर्व कपाटातील साहित्याची फेकफाक करून तपासणी केली. त्याचवेळी 5 आणि 10 रुपयांचे नाणेही कपाटात होते. मात्र चोरट्यांनी या सुट्या पैशांना हातही लावला नाही.