वर्तणुकीच्या निषेधार्थ सदस्यांचे ‘वॉक ऑऊट’
खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रि.धीरज मोहन यांच्या शेवटच्या सभेत महिला सदस्या व कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष यांच्यासह तीन सदस्यांमध्ये प्रलंबित व्यायामशाळेच्या विषयावरून शाब्दिक चकमक उडली. सभेत प्रचंड गोंधळ उडाला. महिला सदस्याच्या अयोग्य वर्तणुकीच्या निषेधार्थ उपाध्यक्ष व तीन सदस्यांनी यावेळी सभेतून वॉकआऊट केले. शुक्रवारी सायंकाळी पार पडलेली खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड सर्वसाधारण सभा सदस्यांच्या गोंधळामुळे व सभात्यागामुळे गाजली. ब्रि. धीरज मोहन यांची पदोन्नती अंतर्गत बदली झाल्याने त्यांच्या कारकीर्दीतील या शेवटच्याच सभेत प्रचंड गोंधळ उडाल्याने या सभेला गालबोट लागले गेले.
सभेच्या प्रारंभीच रेंजहिल्स वॉर्ड क्र. सहा येथील सदस्या वैशाली पहलवान यांनी आक्रमक भूमिका घेत प्रथम आपल्या भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला व्यायामशाळेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आसन ग्रहन करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. ब्रि. मोहन, सीईओ अमोल जगताप, उपाध्यक्ष अभय सावंत व सदस्य या प्रकारामुळे अचंबित झाले.
गैर पद्धतीने व्यायामशाळा सुरू
लष्करी नामनिर्देशित सदस्य कर्नल कटियार यांनी कँन्टोन्मेंट हद्दीतील सर्व व्यायामशाळेचा अभ्यास करुन एक अहवाल बोर्डाकडे सादर केला होता. त्याबाबत बोलताना कर्नल कटियार म्हणाले की, रेंजहिल्स वॉर्ड क्र. सहा येथील रुपेश पिल्ले स्पोर्टस अँड अॅकॅडमी यांच्यावतीने चालविली जात असलेली व्यायामशाळा गैर पद्धतीने चालविली जात आहे. बोर्डाशी कायदेशीर स्वरुपाचा करार करण्यात आला नाही. तसेच खडकी बाजार येथील मित्रसागर व मातृभूमी हेल्थ क्लब, साप्रस येथील लोकमान्य टिळक हेल्थ क्लब, रेंजहिल्स येथील जीवन प्रकाश हेल्थ क्लब येथे ही असाच प्रकार सुरू आहे. मागिल अनेक वर्षांपासून या व्यायामशाळांनी भाडे पद्धतीचा करार केला नाही. नोंदणी पुस्तकांची योग्य प्रकारे देखरेख केली गेली नाही.
ब्रि.मोहन यांनी या प्रकरणाची गंभिरतेने दखल घेत रेंजहिल्समधील व्यायामशाळा तातडीने बंद करण्याचे आदेश बजावले. तर उर्वरीत व्यायामशाळांना कायदेशीरबाबींची पुर्तता करीत नाहीत तो पर्यंत या व्यायामशाळा सिल करण्याचे आदेश बजावले. या निर्णयाला उपाध्यक्ष अभय सावंत ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे सदस्य कमलेश चासकर व सदस्या कार्तिकी हिवरकर यांनी जोरदार विरोध केला.
माफी मागण्यास मनाई
सिलबंदची कारवाई करण्याऐवजी या व्यायामशाळांना कायदेशिरबाबींची पुर्तता करण्याकरीता थोडा वेळ दिला जावा, अशी उपाध्यक्ष सावंत व सदस्यांनी केलेली मागणी बोर्डाने फेटाळुन लावली. याच वेळी सदस्या पहलवान व उपाध्यक्ष सावंत आणि सदस्य कांबळे चासकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. सदस्या पहलवान यांच्या अयोग्य वर्तणुकीबद्दल व या निर्णयाविरोधात उपाध्यक्ष सावंत सहीत सदस्य कांबळे चासकर व हिवरकर यांनी सभेतून बाहेर पडले. सीईओ. जगताप यांनी उपाध्यक्ष सावंत व सदस्यांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढली. सदस्या पहलवान यांनी माफी मागावी व व्यायामशाळांना थोडा अवधी देण्यात यावा अशी मागणी उपाध्यक्ष सावंत यांनी ब्रि.मोहन यांच्याकडे केली. सदस्या पहलवान यांनी या वेळी माफी मागण्यास नकार देत आपण कुठल्याच प्रकारचे चुकीचे वर्तन केले नसल्याचे सांगितले.
व्यायामशाळेवरील सीलबंदची कारवाई स्थगित ठेवून या सर्व व्यायामशाळांनी एक महिन्याच्या कालावधीत सर्व कायदेशिरबाबींची पूर्तता करावा. अन्यथा सीलबंदची कारवाई केली जाईल असा ईशारा बोर्डाच्यावतीने देण्यात आला. अध्यक्ष ब्रि.मोहन यांची दिल्ली येथिल रक्षा मंन्त्रालयाच्या सैन्य मुख्यालयात पदोन्नती अंतर्गत बदली झाली असुन 6 मे ला ते कामावर रुजू होणार आहेत. चंडीगढ येथील ब्रि.प्रशांत जयस्वाल हे 12 मे रोजी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारतील अशी माहीती या वेळी देण्यात आली.